गडचिरोली: बरेच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी (17 जुलै) रोजी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला. दरम्यान शेतात काम करायला गेलेले शेतकरी व मजूर पुरामुळे शेतातच अडकले होते.अखेर आपत्ती व्यवस्थापन पथकाने त्यांना रेस्क्यू करून बाहेर काढले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतला.
प्राप्त माहितीनुसार गडचिरोली तालुक्यातील मौजा गुरवळा ते कुंभी दरम्यान काही मजूर शेतात कामावर गेले होते. दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने लगतचे नदी नाले तुडुंब भरले आणि जवळपास पाच मजूर पुरात अडकले होते.ही माहिती तहसील कार्यालय गडचिरोली द्वारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षामध्ये कळविण्यात आली.
माहिती मिळताच तात्काळ राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर यांचे पथकास घटना स्थळी रवाना करण्यात आले.या पथकाने तातडीने बोटीचे तसेच शोध व बचावाचे सहाय्याने सर्व अडकलेले व्यक्तींना सायंकाळी 5.00 वाजता रेस्क्यु करून सुरक्षित बाहेर काढले.यात प्रमोद श्रावण बोबाटे वय 38 रा.गुरवळा,शेखर उईके वय 48 रा.गडचिरोली,सतिश चुधरी वय 38 रा.विहीरगाव,संजय बोरकुटे वय 45 रा.विहीरगाव,कुणाल बर्डे वय 21 रा.लेखामेंढा यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे शेतात काम करत असताना अचानक मुसळधार पाऊस झाल्याने लगतच्या नदी नाल्यांना पूर आला जवळपास दुपारच्या तीन वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत ही पाच लोक पुरात अडकले होते. काही स्थानिक नागरिकांनी तहसील कार्यालयाला ही माहिती देताच त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाला ही माहिती दिल्याने रेस्क्यू करून त्यांना बाहेर काढण्यात आले.
सदर बचाव कार्य जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर टीम क्रमांक 2 चे पोलिस निरीक्षक डि.जे.दाते यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस उपनिरीक्षक एस.डी.कराळे व त्यांचे पथक यांचे नेतृत्वामध्ये तसेच जिल्हा कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे यांचे उपस्थितीमध्ये सदरची बचाव मोहीम राबविण्यात आली. या वेळी जिल्हा कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अक्षय भांनारकर, आपदा मित्र चंद्रशेखर मोलंगुरवार,कल्पक चौधरी,अजित नरोटे तसेच स्थानिक गुरवळा गावातील नागरिक उपस्थित होते.