भाजपा महिला मोर्चा बल्लारपूर तर्फे सोहळ्याचे आयोजन
चंद्रपूर आशिष घुमे :- –शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी राज्यसरकार कायम आग्रही आहे. त्यामुळे इथे सातत्याने जनतेच्या कल्याणाच्या दृष्टीने प्रत्येक निर्णय घेतला जातो. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ देखील याच विचारातून जन्माला आली आहे. या योजनेतून बहिणींना १५०० रुपये महिना मिळणार आहे. ‘माझी लाडकी बहीण’ ही केवळ एक योजना नसून महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याची लढाई आहे,’ असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.*
बल्लारपूर येथील पेपरमिल रोडवरील नाट्यगृहात आयोजित भाजपा महिला मोर्च्या आयोजित बूथ सशक्तिकरण अभियान कार्यक्रमात ना. मुनगंटीवार यांनी महिलांसोबत संवाद साधला. या कार्यक्रमाला चंदन सिंग चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,बल्लारपूर महिला मोर्चा अध्यक्ष वैशाली जोशी, महामंत्री कांताताई ढोके, वर्षाताई सुंचुवार, आरतीताई आक्केवार , संध्याताई मिश्रा, मनीष पांडे, शिवचंद द्विवेदी, समीर केणे, राजू दारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महिला बुथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बुथ मजबुत करण्याचा संकल्प करायचा आहे. खोटे बोलून निवडणूक जिंकणाऱ्यांनी वीष पसरविले आहे. ते वीष समाजातून बाहेर काढायचे आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. ‘पक्षात महिलांचे संघटन प्रत्येक प्रभागात मजबूत करायचे आहे. बहुतांश महिला गरीब कुटुंबातून आलेल्या आहेत. त्यांच्या समस्या समजून घ्यायच्या आहेत. त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे पक्षाची जबाबदारी आहे. बल्लारपूरमध्ये प्रत्येक गरीब कुटुंबापर्यंत सरकारच्या योजना पोहोचविण्याचा संकल्प करायचा आहे. गरिबांसोबत पूर्ण शक्तीने उभे राहणाऱ्या संघटनेचा आदर्श निर्माण करा,’ असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी महिलांना केले.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यात थेट रक्कम जाणार आहेत. यातून त्या मुलांसाठी, कुटुंबासाठी खर्च करणार आहेत. हा पैसा पुन्हा मार्केटमध्येच येणार आहे. ही राज्याच्या प्रगतीचे आर्थिक चक्र अधिक वेगवान करणारी प्रक्रिया ठरणार आहे,’ असेही ते म्हणाले. गरीब कुटुंबांमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी सर्वांत मोठी अडचण पैशांची असते. पैसा कमी असेल तर शिक्षणात मुलांना पहिले प्राधान्य दिले जाते. मुलींचा विचार नंतर होतो. पण आता कोणत्याही जातीच्या मुलींना इंजिनियर, डॉक्टर व्हायचे असेल तर शंभर टक्के शुल्क सरकार भरणार आहे. त्यातही पुढे जाऊन सरकारने सुशिक्षित मुला-मुलींसाठी १० हजार कोटींची योजना तयार केली. यात मुला-मुलींना १० हजार रुपये विद्या वेतन दिले जाईल, अशी माहितीही ना. मुनगंटीवार यांनी दिली.
‘अपप्रचाराकडे दुर्लक्ष करा’
काही लोक योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. योजना बंद होईल असा अपप्रचार करीत आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष करा. मध्य प्रदेशात ही योजना यशस्वी झाल्यानंतर आपण निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशात १ हजार रुपये दिले जात आहेत, मात्र महाराष्ट्र सरकार १५०० रुपये देणार आहे. काँग्रेस टीका करीत आहे, पण त्यांनी तर बहिणींना कायम उपेक्षित ठेवले, असा टोलाही ना. मुनगंटीवार यांनी लगावला.
.