*राजुरा विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक पात्र
राजुरा :- पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून सादर करण्यात आलेल्या अंतरीम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. त्यानुसार काल (दि. ०१ जुलै) पासून ही योजना राज्यातील पात्र लाभार्थी महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे.
या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक पात्र लाभार्थी महिलेस प्रती महिना १५०० रुपये मिळणार आहेत. त्याकरीता लाभार्थीचे वय २१ ते ६० वर्षापर्यंत असून लाभार्थी विवाहित, विधवा, घटस्फोटीत किंवा निराधार असावी यासोबतच लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारापेक्षा जास्त नसावे, अशी माहीती शासन निर्णयात दिलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणून ऑनलाईन अर्ज, रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, जन्म दाखला किंवा डोमासाईल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याकरीता अर्ज करावयाची शेवटची तारीख ही १५ जुलै देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राजुरा विधानसभा मतदारसंघातील पात्र माता-भगिनींनी आपल्या नजिकच्या मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भेट घ्यावी असे आवाहन भाजपाचे विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांनी केले आहे.
पुढे बोलताना, विधानसभा क्षेत्रात राजुरा, गोंडपिपरी, गडचांदूर, कोरपना व जिवती येथील मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र लाभार्थ्यांना शासकीय योजना मिळवून देण्यासाठी नेहमीच अग्रणी आहेत. आतापर्यंत विविध योजनांच्या हजारो लाभार्थ्यांनी या केंद्रांच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे. आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही राजुरा विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक पात्र लाभार्थी भगीनीस लाभ मिळवून देण्यासाठी आमचे सेवा केंद्र सज्ज आहेत. त्याठिकाणी सेवादुतांची नियुक्ती करण्यात आली असून संगणकाच्या माध्यमातून ही योजना नि:शुल्क पणे राबविण्यात येत आहे. अशी माहिती ही त्यांनी दिली.