गडचिरोली:भामरागड तालुक्यातील सुप्रसिद्ध बिनागुंडा येथील राजीरप्पा धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या दोन पर्यटकांचा धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ११ जून रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.नवनीत राजेंद्र धात्रक (२८) रा.चंद्रपूर आणि बादल शामराव हेमके (३९) रा.आरमोरी हल्ली मुक्काम भामरागड असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या इसमांचे नाव आहे.
महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर व छत्तीसगड राज्याच्या सीमेवर वसलेल्या भामरागड तालुक्यातील बिनागुंडाचा राजीरप्पा धबधबा सर्वांनाच माहीत आहे.अबूझमाड परिसरात निसर्गाने मुक्त उधळण केली आहे.महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमेवर बाराही महिने वाहणारा राजिरप्पा धबधबा या भागाचा वैभव आहे. त्यामुळे या मोसमात निसर्गरम्य पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी याठिकाणी मोठी गर्दी होत आहे. लाहेरी वरून पुढे १८ किलोमीटर खडतर प्रवास असून देखील बरेच पर्यटक दुचाकी आणि स्थानिक पातळीवरील चारचाकी भाड्याने घेऊन धबधबा पाहण्यासाठी जातात.
भामरागड तालुक्यातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील नवनीत धात्रक पत्नी मयुरी धात्रक,ताई नेहा बादल हेमके व मुलगी तसेच त्याचा मित्र नानू साळवे त्याची पत्नी आणि छोटासा मुलगा असे ७ जण १० जून रोजी भामरागडात दाखल झाले. सायंकाळच्या सुमारास तालुका मुख्यालयातील पर्यटन स्थळांना भेट देऊन रात्री नवनीत धात्रक याचा भावजी बादल हेमके यांच्याकडे मुक्काम करून सकाळी बादल हेमके,पत्नी नेहा आणि मुलगी, मेव्हणा नवनीत धात्रक, पत्नी मयुरी धात्रक आणि मित्र नानु साळवे,त्याची पत्नी आणि मुलगी असे ८ जण ताडगाव येथील चारचाकी वाहन भाड्याने घेऊन बिनागुंडा गाठले.
धबधब्याच्या पाण्यात सर्वजण आंघोळ करीत असताना बादल हेमके चा मेव्हणा नवनीत धात्रक खोल पाण्यात बुडत असल्याचे दिसताच त्याचा भावजी बादल हेमके त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला.बराच वेळ ते पाण्यातून बाहेर न आल्याने लगेच हेमके आणि साळवे यांच्या पत्नीनी लाहेरी गाठून आपबीती सांगितल्यावर येथील काही नागरिक बिनागुंडा गाठले अन मृतदेह खोल पाण्यातून बाहेर काढले.याबाबतची शून्य तक्रार लाहेरी पोलीस मदत केंद्रात दाखल करण्यात आली आहे.रात्री उशिरापर्यंत त्यांचे मृतदेह शवविच्छेदन साठी भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.मात्र,रात्रीची वेळ असल्याने शवविच्छेदन होऊ शकले नाही.
नवनीत धात्रक याचे चार दिवसांपूर्वी झालं लग्न
बादल हेमके यांचा मूळ गाव आरमोरी असून ते मागील तीन वर्षापासून भामरागड तालुक्यातील पल्ली ग्रामपंचायतचे सचिव या पदावर कार्यरत आहेत. त्या अगोदर ते चामोर्शी तालुक्यात कार्यरत होते. त्यांची पत्नी नेहा बादल हेमके ह्या चंद्रपूर जिल्हा मुख्यालयात वीज वितरण विभागात लिपिक पदावर कार्यरत आहेत. तर मेव्हणा नवनीत धात्रक हा देखील चंद्रपूर येथील रहिवासी असून त्याची पत्नी मयुरी धात्रक ही गडचिरोली जिल्हा मुख्यालयात महिला व बाल रुग्णालयात अधिपरिचारिका या पदावर कार्यरत आहे. विशेष म्हणजे नवनीत धात्रक आणि मयुरी धात्रक यांचा ७ जून रोजी म्हणजे चार दिवसांपूर्वी लग्न झाला होता.मयुरी सध्या रजेवर आहे.