गडचिरोली: तेलंगणा राज्यात दोन शेतकऱ्यांचा बळी घेणारा रानटी हत्ती रेपणपल्ली (प्राणहिता) वनपरिक्षेत्रातील जंगल परिसरात १८ दिवस मुक्काम ठोकून काल रात्री (मंगळावर २३ एप्रिल) ९ वाजताच्या सुमारास आलापल्ली – सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ओलांडून चिरेपल्ली जंगल परिसरात एन्ट्री करताच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे परिसरातील गावांना आता धोका निर्माण झाला आहे.
३ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास मूलचेरा तालुक्यातील नागुलवाही गावाजवळून वाहणाऱ्या प्राणहिता नदी ओलांडून रानटी हत्तीने तेलंगाणा राज्यात प्रवेश केला होता. कुमरमभीम जिल्ह्यातील चिंतलमानेपल्ली तालुक्यात बुरेपल्ली येथे मिरचीच्या शेतात काम करणाऱ्या अल्लुरी शंकर या शेतकऱ्यावर हल्ला करत ठार केले.त्यानंतर ४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास भाताच्या शेतीत काम करणाऱ्या कारू पोशण्णा नामक शेतकऱ्याला पायाखाली तुडवून ठार केले. २४ तासात दोन शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या रानटी हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी होताच येथील महसूल व वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विविध पथके तयार करून त्या हत्तीवर पाळत ठेवले होते. ६ एप्रिल रोजी त्या रानटी हत्तीने प्राणहिता नदी ओलांडून महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला.
६ एप्रिल पासून त्या रानटी हत्तीने रेपनपल्ली वनपरिक्षेत्रातील विविध जंगल परिसरात मुक्काम ठोकला होता. लंकाचेन आणि लखामेढा जंगलाच्या मधोमध असलेल्या बल्लाळम परिसरात बरेच दिवस त्याचा वास्तव्य होता.रेपणपल्ली, गोलाकर्जी,गुड्डीगुडम, नंदिगाव या परिसरात हत्ती लवकरच एन्ट्री करणार असा अंदाज होता. मात्र, डोंगराळ भाग असल्याने सदर रानटी हत्ती या परिसरात लवकर येऊ शकला नाही.शिवाय या भागात त्याला पोषक वातावरण मिळाल्याने जवळपास तो १८ दिवस याच परिसरात मुक्काम ठोकला.या दरम्यान सिरोंचा वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्या हत्तीवर पाळत ठेवली होती.अखेर काल रात्री (मंगळवार २३ एप्रिल रोजी) गुड्डीगुडम येथील शासकीय आश्रम शाळेच्या परिसरातून आलापली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ओलांडून त्या हत्तीने चिरेपल्ली जंगल परिसरात एन्ट्री केला. एवढेच नव्हे तर या परिसरात एन्ट्री करताच कोत्तागुडम येथील पान टपरीवर हल्ला करत तोडफोड केले. त्यामुळे या भागातील राजाराम, कोडसेपल्ली, कोत्तागुडम, पत्तीगाव,चिरेपल्ली, खांदला, झिमेला आदी गावांना आता त्या हत्तीपासून धोका निर्माण झाला आहे.
सध्या कमलापूर वनपरिक्षेत्रातील या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कमलापूर आणि रेपनपल्ली या दोन वनपरिक्षेत्रातील दोन चमू हत्तीचा मागोवा घेत आहेत.विशेष म्हणजे कमलापुर येथील हत्तीकॅम्प परिसरात ९ हत्ती वास्तव्याने आहेत. सदर रानटी हत्ती या हत्तीकॅम्प कडे जाणार की इंद्रावती नदी होलांडून छत्तीसगड राज्यात जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. काल रात्रीपासून हत्ती कॅम्प मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील ग्रस्त घातली होती.