गडचिरोली:गडचिरोली- चिमूर लोकसभा निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. हे मतदान घेण्यासाठी निवडणूक विभागातर्फे मतदान अधिकाऱ्यांची पथके कालपासूनच रवाना करण्यात येत असून आज जिल्ह्यातील एकूण ४६२ पथके रवाना करण्यात आली. त्यातील ८० पथके हेलिकॉप्टरद्वारे पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात आज हेलिकॉप्टरद्वारे ८० पथके रवाना करण्यात आली. यात आरमोरी येथील ४०, गडचिरोलीतून १२ आणि अहेरी येथील २८ पथकांचा समावेश आहे. तसेच बसद्वारे आरमोरी येथून ८४, गडचिरोलीतून 183 व अहेरी येथून ९२ पथके आणि जीपद्वारे आरमोरी विधानसभा मतदार संघातून ३, गडचिरोली येथून १९ आणि अहेरी येथून ०१ पथक रवाना करण्यात आले. प्रत्येक पथकासोबत झोनल अधिकारी देखील रवाना झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीकरिता विधानसभा मतदार संघनिहाय एकूण १८९१ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. यात आमगाव ३११, आरमोरी ३०२, गडचिरोली ३५६, अहेरी २९२, ब्रम्हपुरी ३१६ तर चिमुर विधानसभा मतदारसंघात ३१४ मतदान केंद्र राहणार आहेत. यातील ३१९ मतदान केंद्रे संवेदनशील तर २०० केंद्र अतिसंवेदनशील व १६ मतदान केंद्रांचे तीव्रसंवेदनशील असे वर्गीकरण जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
अतिरिक्त विभागीय आयुक्तांचा पथकाशी संवाद
आज सकाळी गडचिरोली येथील एम.आय.डी.सी. मैदानाच्या हेलिपॅडवर अतिरिक्त विभागीय आयुक्त माधवी खोडे यांनी हेलिकॉप्टरने बेसकॅम्पवर जाणाऱ्या पथकातील मतदान अधिकाऱ्यांशी संवाद साधला. केंद्राध्यक्ष कोण आहे, टिममध्ये कोण-कोण आहे, कोणत्या मतदान केंद्रावर ड्युटी आहे, तिथे जाण्यासाठी किती अंतर पायी जावे लागेल, निवडणूक विभागाद्वारे जेवण, नाश्ता देण्यात आला आहे का, हेलिकॉप्टरने यापूर्वी गेले आहेत का याबाबत आस्थेने विचारपूस करून माहिती घेतली व एकमेकांना मदत करण्याच्या सूचना दिल्या. गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक अधिकारी राहुल मीना, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके हे यावेळी उपस्थित होते.