गडचिरोली:- सध्याच्या घडीला नोकरी मिळविणे फारच कठीण झाले आहे. त्यात बरेच तरुण-तरुणी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असतात. महाराष्ट्रात एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. एमपीएससी मार्फत दरवर्षी हजारो पदांसाठी भरती केली जाते. यासाठी विद्यार्थी देखील अहोरात्र मेहनत घेत असतात.मात्र यातही काहींना यश मिळते, तर काहींच्या पदरी निराशा पडते. पण दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर डोंगराएवढ्या संकटाला भेदून यशाला गवसणी घालणं शक्य होते. याचेच एक उदाहरण पाहायला मिळाले.शेत मजुराच्या मुलाने कठोर परिश्रम घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली. त्याचे कर सहाय्यक पदी वर्णी लागली आहे.रोशन वामन दुर्गे रा.गोमणी ता.मुलचेरा, जिल्हा गडचिरोली असे त्याचे नाव आहे.
रोशन दुर्गे याचं बालपण गावातल्याच वस्तीवर गेलं.त्याचे प्राथमिक शिक्षण स्वगावी राजे धर्मराव प्राथमिक शाळेत झालं.त्यांनतर त्याच्या वडिलांनी गावातील भगवंतराव हायस्कुल येथे ८ व्या वर्गात नाव दाखल केले. इयत्ता ९ व्या वर्गात त्याने नवोदय विद्यालयची परीक्षा पास केली. नवोदय विद्यालय घोट येथे इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्याने वर्धा येथे बी ई (मेकॅनिकल इंजिनियर) केला.त्यानंतर त्याने चिमूर येथे एमएसडब्ल्यू केला. त्यानंतर त्यांनी २०१६ ते १८ दोन वर्ष नेहरू युवा केंद्र येथे युवा समन्वयक म्हणून काम केला.तर १ मार्च २०१९ ते ३० जून २०२२ पर्यंत त्याने महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती व चंद्रपूर तालुक्यातील दुर्गम भागात ग्राम विकासाबद्दल योगदान दिले. दरम्यान २०२२ मध्ये एमपीएससी परीक्षेत कर सहाय्यक व मंत्रालयीन लिपिक ही दोन पदे निघाली होती.कोरोना मुळे ही परीक्षा मार्च २०२३ ला घेण्यात आली. त्याचा निकाल नोव्हेंबर २०२३ ला जाहीर झाला असून त्यात त्याला घवघवीत यश मिळाले. १३ मार्च २०२४ रोजी कर सहाय्यक म्हणून त्याला नियुक्ती आदेश मिळाले असून नुकतेच १० एप्रिल रोजी तो विशेष राज्यकर आयुक्त कार्यालय, माझगाव मुंबई येथे रुजू झाला.
रोशन दुर्गे यांचे वडील शेत मजूर असून घरी पत्नी,दोन मुली,तीन मुलं असा भला मोठा परिवार.घरची परिस्थिती हलाखीची होती.मात्र आपल्या मुलांना खूप शिकवायचं वामन दुर्गे यांची मोठी इच्छा होती.वडिलांप्रमाणे मुलांना देखील शिक्षणात रस होता.त्यामुळेच सर्वच मुलं शिकले. घरातील एक मुलगी आरोग्य विभागात आरोग्य सेविका म्हणून काम करते.तर मोठा मुलगा सुशिक्षित असूनही नोकरी नसल्याने मजुरी करत आपला उदरनिर्वाह करतो.तर दुसरी मुलगी गृहिणी आहे.एक मुलगा नागपूर येथे रेल्वे मध्ये नोकरीला आहे.
रोशन हा सर्वात लहान मुलगा असून त्याने इयत्ता नववी नंतर मागे वळून बघितले नाही. घरची हलाखीची परिस्थिती समजून घेऊन वडिलांवर बोझा न बनता त्याने बाहेरच्या बाहेरच काम करत शिक्षण घेतले. अखेर त्याच्या कठोर परिश्रमांना यश आले असून कर सहाय्यक पदी निवड झाल्याने सर्व स्तरावरून त्याचे कौतुक केले जात आहे.
विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहावे
दरम्यान यश मिळाल्यानंतर त्याने आपलं हे यश आई-वडिलांच्या कष्टाचं चीज असल्याचे म्हटले.तर विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहून अभ्यासाकडे लक्ष द्यावे आणि आपला लक्ष केंद्रित करून त्याचा जिद्दीने पाठलाग करावा असा महत्त्वाचा सल्ला देखील त्याने दिला आहे.