गडचिरोली: राज्यातील एकमेव शासकीय हत्तीकॅम्प म्हणून ओळख असलेल्या कमलापूर मध्ये आज सकाळपासून हालचालींना वेग आला असून विविध चर्चांना उधाण आला आहे.परिसरात वन विभागाचे अधिकारी आणि मोठे वाहन दाखल झाले असून पेंच येथील प्रस्तावित हत्तीकॅम्प मध्ये येथील ‘मंगला’ नामक मादी हत्तीणीला हलविण्याची प्रक्रिया तर सुरू नाही ना ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
राज्यातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभाग अंतर्गत येत असलेल्या कमलापूर हत्ती कॅम्पची ओळख आहे. या ठिकाणी अजित, मंगला, बसंती, रूपा, राणी, प्रियंका, गणेश, लक्ष्मी असे आठ हत्ती आहेत.या अगोदरच येथील हत्तींना गुजरात राज्यातील अंबानींच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या झु मध्ये हलविणार होते.मात्र,स्थानिकांचा आणि वन्य प्रेमींचा मोठा विरोध झाल्याने केवळ आलापल्ली जवळील ‘पातानील’ येथील हत्तींना हलविण्यात आले.
जंगलात नियमित गस्त घालणे, दुर्गम भागातील बचाव कार्य तसेच इको टुरिझमच्या उद्देशाने महाराष्ट्राच्या पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने चार हत्ती आणण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे काही महिन्यापूर्वी पाठविला होता. त्याला मंजूरी मिळाल्यावर पहिल्या टप्प्यात दोन नर हत्तींना याठिकाणी आणण्यात आले होते.या दोन नर हत्तींसोबत गडचिरोली जिल्ह्यातील कामलापूर हत्तीकॅम्प मधील ‘मंगला’ या मादी हत्तीणीची निवड करण्यात आल्याची माहिती काही दिवसापूर्वी समोर आली होती.मिळालेल्या माहितीनुसार रंजन (वय २५ वर्षे), सुब्रमण्यम (२५ वर्षे) आणि भीमा (वय ५३ वर्षे) अशी निश्चित केलेल्या तीन हत्ती असून हे सर्व हत्ती प्रशिक्षित असल्याची माहिती आहे.
पेंच मध्ये होणाऱ्या प्रस्तावित हत्ती कॅम्प मध्ये कमलापूर येथील मंगला नामक मादी हत्तीनीला घेऊन जाणार असल्याची माहिती अगोदरच वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली होती. मात्र याबाबत येथील वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता असा कुठलाच प्रस्ताव आमच्याकडे आला नसल्याचे त्यांनी त्यावेळेस सांगितले होते.आज मात्र या परिसरात मोठ्याप्रमाणात हालचाली सुरू असून वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून गोपनीयता बाळगण्यात येत असल्याने येथील ‘मंगला’ हत्तीणीला हलविण्याची प्रक्रिया तर सुरू नाही ना ? असा प्रश्न स्थानिकांना व वन्य प्रेमींना पडला आहे.याविषयी माहिती घेण्यासाठी येथील वनसंवरक्षक रमेश कुमार आणि सिरोंचाचे उप वनसंवरक्षक पूनम पाटे यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केले असता त्यांनी कॉल घेतला नाही.
पेंच येथे येणाऱ्या पर्यटकांना आता इत्तर वन्यजीवासोबत गजराजचेही दर्शन घेता यावा यासाठी आटापिटा सुरू असलेतरी राज्यातील एकमेव असा कमलापूर येथील शासकीय हत्तीकॅम्प कडे शासनाचे मात्र अक्षरशः दुर्लक्ष होत आहे.स्थानिकांचा विरोध असतानाही येथील हत्ती हलविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या आणि दाखल झालेले वाहन बघता काहीतरी खिचडी शिजत असल्याचे बोलले जात आहे. वाघाचे वरिष्ठ अधिकारी याबाबत बोलण्यासाठी तयार नसल्याचे दिसून येत आहे.