महेश गुंडेटीवार/गडचिरोली: नुकतेच १८ जानेवारी रोजी मुलचेरा तालुक्यातील रेंगेवाही जंगल परिसरात वनविभाग आणि आरआरटीने नरभक्षक वाघिणीला जेरबंद केले होते.वाघिणीला जेरबंद केल्यावर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतला होता.मात्र, सोमवार (५फेब्रुवारी) रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास वाघाने हल्ला करत हरणाचा फडशा पाडल्याची घटना कोपरअली ते कोठारी रस्त्यावरील चाची नाल्याजवळ घडल्याने पुन्हा एकदा मुलचेरा तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे मागील ५ ते ६ महिन्यापासून मुलचेरा तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरू असून अनेक वन्य प्राणी आणि पाळीव प्राण्यांना वाघांनी हल्ला करून ठार केले आहे. एवढेच काय तर ७ जानेवारी रोजी अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथील सुषमा देवदास मंडल, १५ जानेवारी रोजी मुलचेरा तालुक्यातील कोडसापूर येथील रमाबाई मुंजमकर आणि २० जानेवारी रोजी लोहारा येथील बापू नानाजी आत्राम यांना सुद्धा वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला.
त्यानंतर सदर नरभक्षक वाघाला जेर बंद करण्याची मागणी होताच वनविभाग आणि आरआरटीने रेंगेवाहीच्या जंगलात एका वाघिणीला जीर बंद केले. वाघिणीला निर्बंध केल्यावरही रविवार (४फेब्रुवारी) रोजी मुलचेरा ते घोट मार्गावर ये-जा करणाऱ्यांना पुन्हा वाघाचे दर्शन झाले.ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यावर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच आज सकाळी जवळपास ९ वाजता सुमारास मल्लेरा जवळील चाची नाल्याजवळ वाघाने हरणावर हल्ला केला.या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना हे दिसताच वाघाने हरणाला रस्त्याच्या कडेला सोडून जंगलात धूम टोकाला.
वाघाला पाहताच अनेकांनी माघार घेतली.वाघ जंगलात गेल्यावर याठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली. या घटनेची माहिती मिळताच मार्कंडा वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. वाघिणीला जेरबंद केल्यावरही या परिसरात पुन्हा वाघाचे दर्शन झाले आणि वन्यप्राणीवर हल्ला झाल्याने या परिसरात आणखी वाघ असल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या या घटनेमुळे परत एकदा मुलचेरा तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.