गडचिरोली:पेंच येथील प्रस्तावित हत्तीकॅम्प मध्ये कमलापूर शासकीय हत्तीकॅम्प मधून ‘मंगला’ हत्तीणीला घेऊन जाण्यासाठी अत्यंत गोपनीय पद्धतीने हत्तीकॅम्प परिसरात प्रयत्न सुरू होते.मध्यरात्रीच या परिसरात वाहन दाखल झाले होते.याची माहिती मिळताच भ्रष्टाचार निवारण समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून ‘मंगला’ हत्तीणीचे स्थानांतरण थांबविण्याची विनंती केली.अखेर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ माहिती घेऊन स्थानांतरण थांबविले.
इको टुरिझमच्या उद्देशाने महाराष्ट्राच्या पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने चार हत्ती आणण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे काही महिन्यापूर्वी पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाल्यावर पहिल्या टप्प्यात दोन नर हत्ती या ठिकाणी आणण्यात आले होते. कमलापूर शासकीय हत्ती कॅम्प मधील ‘मंगला’ या मादी हत्तीची निवड करण्यात आल्याने त्या हत्तीणीला पेंच येथे घेऊन जाण्यासाठी मध्य रात्रीच्या सुमारास वाहन दाखल झाले होते.
कमलापूर वनपरिक्षेत्र अधिकारी आणि येथील कर्मचारी अत्यंत गोपनीय पद्धतीने ‘मंगला’ हत्तीणीला पहाटेच्या सुमारास हलविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.मात्र,मंगला हत्तीणीला ट्रक मध्ये चढविणे कठीण झाले होते.अनेक प्रयत्नानंतरही यश न आल्याने ब्लेड ट्रॅक्टर आणून खड्डा करून रॅम्पच्या साहाय्याने मंगला ला ट्रक मध्ये चढविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच वरिष्ठांकडून हत्ती स्थानांतरण थांबविण्याचे निर्देश आले.त्यामुळे वन अधिकारी व कर्मऱ्यांनी वाहने घेऊन माघार घेतला.त्यानंतर हत्तीकॅम्प परिसरात जाऊन पाहणी केले असता,रॅम्प बनविण्यासाठी खड्डा खोदल्याचे दिसून आले आणि कर्मचारी थकलेल्या अवस्थेत होते.यावेळी संतोष ताटीकोंडावार,उपसरपंच सचिन ओलेटीवार, आणि टायगर ग्रुपचे साई तुलसीगारी,दौलत रामटेके आदी उपस्थित होते.
…तर कुणाला थांगपत्ताही लागला नसता
वरिष्ठांच्या निर्देशानुसार अत्यंत गोपनीय पद्धतीने ६ फेब्रुवारी च्या रात्रीपासूनच ‘मंगला’ हत्तीणीला हलविण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आले होते.हत्तीणीला घेऊन जाण्यासाठी परिसरात ट्रक दाखल झाले होते.पहाटेच्या सुमारास प्रयत्न सुरू झाले.मात्र,हत्ती काही ट्रक मध्ये बसेना, अशी अवस्था झाल्याने येथील कर्मचाऱ्यांना बराच कालावधी लागला.खात्रीलायक सूत्रांच्या माहितीवरून बातमी प्रकाशित होताच संतोष ताटीकोंडावार यांनी प्रयत्न केले.थेट वन मंत्र्यांशी चर्चा करून विनंती केली.अखेर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निर्देश देताच वरिष्ठांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करत येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना हत्ती स्थानांतरण थांबविण्याचे सांगितले.
जर मंगला हत्तीण पहाटेच्या सुमारास ट्रक मध्ये चढला असता तर हत्तीणीला थांबविणे कठीण झाले असते आणि कुणाला थांगपत्ताही लागला नसता अशी चर्चा गावात सुरू आहे.