गडचिरोली:वन विभाग आणि आरआरटी ने मागील महिन्यात वाघिणीला जेरबंद केल्यावरही मुलचेरा तालुक्यातील मुलचेरा-घोट मार्गावर रविवार (४ फेब्रुवारी) रोजी सायंकाळच्या सुमारास भर रस्त्यावर वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली आहे.
मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील दक्षिण भागात वाघांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून वाघाच्या हल्ल्यात अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथील सुषमा देवदास मंडल, मुलचेरा तालुक्यातील कोडसापूर येथील रमाबाई मुंजमकर आणि लोहारा येथील बापू नानाजी आत्राम असे अनुक्रमे दोन महिला आणि एक पुरुष असे तिघांचा बळी गेला.त्यानंतर वाघाला जेरबंद करण्याची मागणी होताच १८ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास रेंगेवाहीच्या जंगलात आरआरटी आणि वन विभागाच्या चमूने एका वाघिणीला जेरबंद केले.
त्यानंतर या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतला असतानाच परत एकदा रविवार (४ फेब्रुवारी) रोजी सायंकाळच्या सुमारास आलापल्ली येथील काही नागरिक गडचिरोली वरून चामोर्शी-घोट-मुलचेरा मार्गे आलापल्लीकडे येत असताना सायंकाळच्या सुमारास अंबेला जवळपास वाघ रस्ता ओलांडताना निदर्शनास आले.आलापल्ली येथील एका युवकाने वाघ रस्ता ओलांडताना त्याचे चित्रफीत तयार केली असून सदर चित्रफित समाज माध्यमात व्हायरल होत आहे.
वाघिणीला जेरबंद केल्यावरही पुन्हा एका वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते,चामोर्शी आणि गडचिरोलीकडे जाणाऱ्यांसाठी अत्यंत शॉर्टकट मार्ग आहे.सदर परिसर हा घनदाट जंगलाने व्यापला असून हा जंगल घोट वनपरिक्षेत्रात आणि एफडीसीएम अंतर्गत समाविष्ट असल्याने दोन्ही विभागाकडून जनजागृती करणे गरजेचे आहे.