आलापल्ली (गडचिरोली ) : विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात ठराविक ध्येय ठेवून त्याची पूर्तता करण्यासाठी वाटचाल केल्यास निश्चितच यश मिळणार असल्याचे प्रतिपादन अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी केले.
नागेपल्ली येथील सेंट फ्रान्सिस इंग्लिश मिडीयम कॉन्व्हेन्टचे वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवारी (३० जानेवारी) पार पडले. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. लीली, प्रमुख अतिथी म्हणून अहेरीचे न्यायाधीश शाहिद, अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, गटशिक्षणाधिकारी धनंजय कांबळे, केंद्रप्रमुख जगदीश बोम्मावार, मुख्याध्यापक अर्चना, राणी दुर्गावती हायस्कूलचे मुख्याध्यापक गजानन लोनबले, गोवाडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश म्हणाले,
नागेपल्ली येथील सेंट फ्रान्सिस इंग्लिश मिडीयम कॉन्व्हेन्टच्या वार्षिक स्नेसंमेलन कार्यक्रमांत येऊन मला अक्षरशः माझे शालेय जीवन आठवले असल्याचे सांगत त्यांनी इयत्ता तिसरीत शिकत असताना घडलेल्या घटनेवरून त्यांचा जीवन कसे बदलले, हा संपूर्ण किस्सा सांगितला.
तामिळनाडू राज्यातील वेल्लूर जिल्ह्यात एक लहानशा गावात प्राथमिक शिक्षण घेत असताना शाळेची एकदिवसीय शैक्षणिक सहल निघाली होती. जिल्हा मुख्यालय गाठताच संपूर्ण शहरात चक्काजाम सुरू होता. काही तासांनी कळलं होतं की, वेल्लूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी सत्यमूर्ती यांचे स्थानिक नेत्यांशी पटत नसल्याने त्यांची तत्काळ बदली करण्यात आली होती. मात्र, सत्यमुर्ती हे लोकहिताचे
काम करत होते. अल्पावधीतच त्यांनी सर्वसामान्यांच्या हृदयात स्थान मिळविले होते .त्यामुळे त्यांचे स्थानांतरण थांबवावे, यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत चक्काजाम केला होता. कुठलेही रक्तनाते नसताना सर्वसामान्य जनता जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत असेल तर त्या अधिकाऱ्यांनी कसा आदर्श निर्माण केला यावरून लक्षात आले. त्यामुळे त्याच दिवशी ठरवलं की आयुष्यात आयएएस, आयपीएस किंवा आयएफएस अधिकारी व्हायचे. तेच ध्येय समोर ठेवून वाटचाल केल्याने आज आयपीएस अधिकारी म्हणून तुमच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली.
त्यामुळे ध्येय निश्चित करून चांगला अभ्यास करा, असे देखील त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
तर विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षकांची महत्वाची भूमिका
असते, पालकांनी देखील आपल्या पाल्यांना आवडीनुसार क्षेत्र निवडू द्यावे, त्यांच्यावर कुठलाही दबाव आणू नका, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान मान्यवरांचे आगमन होताच विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला. स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध नृत्य करत सर्वांना मंत्रमुग्ध केले.