ध्येयवेड्या व कर्तव्य परायण व्यक्तीच्या कार्याला मर्यादा राहत नाहीत. काळ, वेळ, परिस्थिती व कोणीही व्यक्ती त्याच्या सत्कार्याला अडवू शकत नाही. मुळातच ती व्यक्ती सर्व शक्य अशक्य बाबींवर आरुढ होऊन आपले सत्कार्य करण्यासाठी जीवाचे रान करते. वेळ, काळ व परिस्थितीच्या बंधनासही ती व्यक्ती जुमानत नाही. हाती घेतलेले कार्य ती व्यक्ती ठाम निश्चयाने पूर्णत्वास नेते. आपले कार्य सिद्ध झाल्याशिवाय ते स्वस्त बसत नाहीत. हे मात्र नक्कीच. अशी ध्येयवेडी माणसेच स्वकर्तृत्वाने काळाच्या पडद्यावर आपली भूमिका बजावून कायम स्मरणात राहतात. अशा कर्तुत्ववान व्यक्तिंमध्ये गुरुवर्य प्राचार्य स्व. वसंतरावजी दोंतुलवार यांचेही कार्य उल्लेखनीय आहे. किंबहुना जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीचा मागोवा घेतल्यास त्यांच्या कार्याचा उल्लेख झाल्याशिवाय राहणार नाही.
अशा कर्तुत्ववान व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या प्राचार्य स्व. वसंतरावजी दोंतुलवार यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात श्री लच्छयाजी व सौ. रमाबाई या दाम्पत्याच्या पोटी दि. ८ ऑगस्ट १९४५ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात असलेल्या देवलमारी या छोट्याशा अभावग्रस्त अशा खेड्यात झाला. हा परिसर म्हणजे दर्या, खोऱ्या व घनदाट जंगलाने व्यापलेला होता. सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या वसंतरावांना एकूण पाच भावंडे होती या सर्व भावंडांचे बालपण निसर्गाच्या सहवासात खेळण्या बागडण्यात गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावीच पूर्ण झाले. त्यांच्यात असलेली जिद्दी, चिकाटी व अभ्यासुवृत्तीला ओळखून त्यांच्या वडिलांनी स्वगावात पुढील शिक्षणाची सोय नसल्यामुळे अहेरी येथील धर्मराव कृषी विद्यालयात दाखल केले. नंतर त्यांनी हायस्कूलचे शिक्षण चंद्रपुरातील सिटी हायस्कूल मधून उत्तम गुणांनी पूर्ण केले. त्यांच्यातील गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून घरच्यांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी नागपूर येथे पाठविले. परंतु तेथे काही काळ गेल्यानंतर प्राकृतिक कारणास्तव त्यांना नागपूर सोडून चंद्रपुरात शिक्षणासाठी परतावे लागले. येथील जनता महाविद्यालयातून त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
बी.ए. पदवी प्राप्त केल्यानंतर घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे गडचिरोली येथील वसंत विद्यालयात शिक्षक पदावर ते रुजू झाले. त्या काळातही आपले पुढील शिक्षण न थांबवता त्यांनी ते शिक्षण पूर्ण केले. येथील चार वर्षाच्या नोकरीच्या काळातही ते अल्पावधीतच विद्यार्थी प्रिय झाले. त्यांचे इंग्रजी विषयावर उत्तम प्रभुत्व होते. पुढे ते 1972 मध्ये बल्लारपुरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. आपल्या अध्यापन व संवाद कौशल्यामुळे येथेही ते विद्यार्थी प्रिय झाले. येथे बराच काळ ज्ञानदानाचे कार्य केल्यानंतर माजी आमदार व शिक्षण महर्षी स्व. प्रभाकररावजी मामुलकर यांनी सुरू केलेल्या श्री शिवाजी महाविद्यालय, राजुरा येथे प्राचार्य म्हणून ते रुजू झाले. येथेही त्यांनी आपल्या कार्याप्रती एकनिष्ठ राहून आपले कर्तव्य पार पाडले. त्यांच्यातील एकनिष्ठता, प्रामाणिकपणा, शिस्त व उत्तम प्रशासनामूळे ते अल्पकाळातच व्यवस्थापनाच्या विश्वासास पात्र ठरले. विद्यार्थी, कर्मचाऱ्यांशी आपुलकीचा भाव, विद्यार्थी व महाविद्यालय हिताचे कार्य केल्यामुळे येथेही ते चांगलेच नावारूपास आले. येथील प्राचार्य पदाचा काळ म्हणजे त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळच म्हणावा लागेल.
एक शिक्षक ते प्राचार्य असा प्रवास करत त्यांनी शिक्षण क्षेत्रात बरेच अनुभव घेतले. त्यातील बारकावे ओळखले. त्यांच्यातील जिज्ञासू शिक्षक व शिक्षण तज्ञ त्यांना स्वस्त बसू देत नव्हता. काहीतरी उल्लेखनीय कार्य करण्याचे त्यांनी ठरविले. आजही अनेक ठिकाणी उच्च शिक्षणाची सोय नाही. तेथे उच्च शैक्षणिक सुविधा आपण उपलब्ध करून दिले पाहिजे असे त्यांना मनोमन वाटत होते. हे विचार त्यांनी स्व. मामुलकर यांच्याकडे बोलून दाखवले. मामुलकर साहेबांच्या मार्गदर्शनात पुढील शैक्षणिक कार्य करण्यास ते सिद्ध झाले. यातूनच एका शिक्षण संस्थेची सुरुवात झाली.
आपल्या विधायक कार्याची सुरुवात करण्यासाठी त्यांनी 1998 ला चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असलेल्या पोंभूर्णा, विसापूर व घुग्घूस या ठिकाणी शाळा महाविद्यालयाची सुरुवात करून गरजूंपर्यंत ज्ञानगंगा पोहोचविण्याचे कार्य सुरू केले. हे विधायक कार्य सुरू असताना नियतीला ते पहावले नाही. आपले कार्य व स्वप्न पूर्ण होण्याआधीच प्राचार्य, वसंतरावजी दोंतुलवारांचे 30 जानेवारी 2000 ला दुःखद निधन झाले.
त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत त्यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांच्या अर्धांगिनी प्रा. शुभांगीताई दोंतुलवार व त्यांचे सुपुत्र श्री स्वप्नीलजी दोंतुलवार यांनी संस्थेच्या कार्याचा विस्तार करत. गोंडपिपरी व बल्लारपूर सारख्या ठिकाणी महाविद्यालय सुरू करून संस्थेला व शाळा महाविद्यालयांना प्रगतीपथावर नेत गरजूंना शैक्षणिक सेवा देत जिल्ह्यच्या शैक्षणिक विकासात हातभार लावत आहेत. एवढेच नाही तर या संस्थेला जिल्ह्यातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून नावारूपास आणले आहे.आज ही संस्था रौप्य महोत्सवी वर्षात आहे. अशा या थोर शिक्षण तज्ञाच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या शैक्षणिक कार्यास व स्मृतीस विनम्र अभिवादन .
डॉ. माधव कांडणगिरे, घुग्घूस