गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठाच्या चमुची सकारात्मकता आणि विश्वास यामुळेच आम्ही येणाऱ्या अडचणींवर मात करू शकलो. आम्हाला ‘आव्हान’ शिबिराचा अनुभव जरी नसला तरी हे आव्हान आम्ही पेललं. महाराष्ट्राच्या अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील हे गोंडवाना विद्यापीठ आहे जिथे पुरेशा सुविधा नसल्या तरी इथले लोकं सक्षम आहेत. आम्ही कुठल्याही बाबतीत कमी नाही .आव्हानच्या या शिबिरातून जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन घ्यावा असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आव्हान शिबाराच्या आजच्या नवव्या दिवशी राज्यभरातून आलेल्या २२ विद्यापीठातील ३७ महिला आणि ३७ पुरुष संघव्यवस्थापक आणि एन. डी. आर. एफ. चमू यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन आज करण्यात आले होते.त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
यावेळी मंचावर प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण,इन्स्पेक्टर पंकज चौधरी, कवियत्री बहिणाबाई चौधरी जळगाव विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. सचिन नाद्रे, रासेयो संचालक गोंडवाना विद्यापीठ तथा समन्वयक आव्हान२०२३ डॉ. श्याम खंडारे उपस्थित होते .
एन. डी. आर. एफ.चे इन्स्पेक्टर पंकज चौधरी म्हणाले, आपदा ही शार्क माश्यासारखी असते. जर आपण काळजी घेतली नाही तर आपले जीवन अस्तव्यस्त करून टाकते.त्यामुळे आव्हान च्या शिबिराचा लाभ विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. जो मानसन्मान आम्हाला विद्यापीठाने दिला तो कायम स्मरणात राहील . प्रत्येक महाविद्यालयाने या आव्हान शिबिरानंतर कॉलेज स्तरावर आपदा प्रबंधन विभाग तयार करायला हवा अशा या विभागांचा समाजातील लोकांना उपयोग होईल असे ते म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्हा संघ व्यवस्थापक डॉ.सय्यद वसीम , मुंबई विद्यापीठाच्या संघ व्यवस्थापक सुमन शर्मा ,कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. सचिन नाद्रे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला वित्त व लेखाअधिकारी भास्कर पठारे उपस्थित होते.
प्रास्ताविक रासेयो संचालक तसेच आव्हान २०२३चे समन्वयक डॉ.श्याम खंडारे यांनी ,संचालन आणि आभार मराठीचे प्रा. डॉ. हेमराज निखाडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहसमन्वक डॉ. प्रिया गेडाम यांच्यासह सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.