गडचिरोली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी महाराष्ट्र – तेलंगाणा सीमेवरील वाहणाऱ्या गोदावरी नदीवर उभारलेल्या कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाचा एक भाग असलेल्या मेडिगड्डा (लक्ष्मी) बॅरेजला भेट दिली, बांधकामाचा दर्जा निकृष्ट असून बीआरएस सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी केले.
सध्या तेलंगणात प्रचार करत असलेले राहुल गांधी हैदराबादहून हेलिकॉप्टरने जयशंकर भूपालपल्ली येथील आंबटपल्ली गावातून बॅरेजवर पोहोचले. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांसमवेत त्यांनी नुकसान झालेल्या बॅरेजची पाहणी केली. यावेळी तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते मल्लू भट्टी विक्रमार्का, आमदार श्रीधर बाबू आणि इतर नेते राहुल गांधींसोबत होते.
बॅरेजला भेट देण्यापूर्वी त्यांनी आंबटपल्ली गावात महिलांच्या सभेला संबोधित केले.त्यांनी केसीआर सरकारचा सर्वात मोठा घोटाळा म्हणून कालेश्वरमचे वर्णन केले. “मला हे वैयक्तिकरित्या पहायचे होते आणि म्हणूनच मी येथे आलो आहे,” असे ते म्हणाले.या प्रकल्पात मुख्यमंत्री केसीआर यांनी तेलंगणातील जनतेकडून एक लाख कोटी रुपयांची लूट केल्याचा आरोप त्यांनी केला.तर, या प्रकल्पाचा लोकांना फायदा झाला नसल्याचा दावाही त्यांनी केला.
या घोटाळ्यावर प्रकाश टाकण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी उभारलेल्या ‘कालेश्वरम एटीएम’कडे बोट दाखवत राहुल गांधी यांनी ‘कलेश्वरम केसीआर एटीएम’ असे नामकरण करण्याची सूचना केली.केसीआर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भ्रष्टाचाराचा सर्वाधिक फटका महिलांना बसला आहे, असा आरोप करत त्यांनी केसीआरने जेवढा पैसा लुटला, तेवढाच पैसा काँग्रेस लोकांना परत देईल.असे आश्वासनही त्यांनी दिले.
राज्यात सत्तेवर आल्यानंतर महालक्ष्मी योजनेंतर्गत प्रत्येक महिलेला मासिक 2,500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर केवळ 500 रुपयांना पुरविला जाईल तर महिलांना आरटीसी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. गॅस सिलिंडर आणि बस प्रवासावरील बचतीसह प्रत्येक महिलेला दरमहा 4,000 रुपयांचा लाभ मिळणार असल्याचे ते म्हणाले.बीआरएस, भाजप आणि एमआयएम एक असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करून त्यांनी तेलंगणात लोकराज्य आणण्यासाठी काँग्रेसला सत्तेत आणण्याचे आवाहन त्यांनी केले.