गडचिरोली:क्षमता चाचणीवर बहिष्कार टाकणाऱ्या अहेरी प्रकल्पातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि मानधन शिक्षक असे एकूण २६१ शिक्षकांना ७ दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे नोटीस अहेरीचे प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांनी बजावली आहे.त्यामुळे क्षमता परिक्षेवर बहिष्कार टाकणे आता आश्रम शाळेतील शिक्षकांना महागात पडू शकतो असे चित्र दिसत आहे.
आदिवासी विकास विभाग अंतर्गत आयुक्त स्तरावरून राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षकांची क्षमता परीक्षा राज्यभरात रविवार १७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.या क्षमता परीक्षेवर जवळपास शंभर टक्के शिक्षकांनी एकजुटीने बहिष्कार टाकला होता.बोटावर मोजण्याइतके शिक्षकांनी ही परीक्षा दिली.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी अंतर्गत ११ शासकीय व १५ अनुदानित आश्रम शाळेतील एकूण २७२ शिक्षकांची ही क्षमता परीक्षा होणार होती.मात्र,केवळ १० शिक्षकांनी परीक्षा दिली.
त्यामुळे अहेरी प्रकल्पातील अनुदानित व शासकीय आश्रम शाळेतील ३१ मुख्याध्यापक, १९१ शिक्षक व ३९ मानधन शिक्षक असे एकूण २६१ शिक्षकांना ७ दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे नोटीस १८ सप्टेंबर २०२३ ला सदर कार्यालयाकडून जावक करण्यात आले आहे.
प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांनी काढलेल्या पत्रात वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे, शिक्षक क्षमता चाचणी वर बहिष्कार टाकणे, विद्यार्थ्यांची पटसंख्या व उपस्थिती बाबत दुर्लक्ष करणे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळणे अशा विविध कारणांचा उल्लेख केला असून प्राथमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक,प्राथमिक मुख्याध्यापक, माध्यमिक मुख्याध्यापक, उच्च माध्यमिक शिक्षक तसेच मानधन शिक्षक या सर्वांना ७ दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.त्यामुळे आश्रम शाळेतील शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.