गडचिरोली:-चिल्लर विक्रेत्यांना दारू पुरवठा करण्यासाठी एका म्हाताऱ्याच्या घरी अवैधरित्या देशी दारू साठवून ठेवल्याची माहिती मिळताच जिमलगट्टा पोलिसांनी घरात धाड टाकून तब्बल १ लाख ७५ हजार रुपयांची ५० पेट्या दारू जप्त केली असून यातील आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार जिमलगट्टा उप पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या किष्टापूर टोला येथील बक्का बोडका तलांडी या म्हाताऱ्या व्यक्तीच्या घरी परिसरातील चिल्लर विक्रेत्यांना दारू पुरवठा करण्यासाठी काही दारू विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू साठवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळताच येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, जिमलगट्टा उप पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संगमेश्वर बिरादार यांनी आपल्या पोलीस जवानांना घेऊन किष्टापूर टोला गाठले आणि मिळालेल्या माहितीनुसार त्या घरात धाड टाकले असता मोठ्या प्रमाणात दारू साठवून ठेवल्याचे आढळले.
पोलिसांनी सदर पेट्या उघडून बघितले असता त्यात ९० एम एल क्षमता असलेले रॉकेट कंपनीचे देशी दारूच्या प्लास्टिक बाटल्या आढळले.एका बॉक्स मध्ये १०० बाटल्या असे तब्बल ५० बॉक्स त्याठिकाणी होते.प्रती नग ३५ रुपये प्रमाणे असे एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा दारू पोलिसांनी जप्त केला.याबाबत बक्का बोडका तलांडी यांना विचारणा केली असता आदेश सत्यप्रकाश यादव,रामनरेश साहेबसिंह यादव आणि मनोज मुजुमदार यांनी विक्री करिता माझ्या घरी साठवून ठेवल्याची माहिती त्यांनी दिली.
या माहितीवरून पोलिसांनी त्या गावात शोध घेऊन राम नरेश यादव व आदेश यादव या आरोपींना अटक केली. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोल्हे करीत आहेत.जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने या भागात अवैध दारू तस्करी व विक्री सुरू असल्याचे या करवाईवरून लक्षात येते.नुकतेच १६ सप्टेंबर रोजी जिमलगट्टा पोलिसांनी अशोका लेलँड कंपनीच्या १० चाकी माल गाडीसह तब्बल २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.लगेच दुसऱ्या दिवशी १७ सप्टेंबर ला केलेली ही दुसरी कारवाई असून यात त्यांनी तब्बल १ लाख ७५ हजार रुपयांचा दारू जप्त केल्याने या भागात दारू पुरवठा करणारे आणि दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.