गडचिरोली:गावालगत असलेल्या बीएसएनएल टॉवर जवळील खड्ड्यात एका ४० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.ही घटना मुलचेरा तालुक्यातील मोहूर्ली येथे आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली असून रामुलू आलाम (४०) राहणार मुलचेरा असे मृतकाचे नाव आहे.
मुलचेरा तालुक्यातील मोहूर्ली गावलागतच असलेल्या बीएसएनएल टॉवर जवळील खड्ड्यात १८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला.याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी एकच गर्दी केली.गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती देताच मुलचेराचे प्रभारी अधिकारी अशोक भापकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल होऊन मोका पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय,मुलचेरा येथे पाठविले आहे.नेमकं हत्या की आत्महत्या हे अद्यापही कळू शकले नाही.पोलीस त्या दिशेने तपास करीत असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच याचा उलगडा होणार आहे.
रामुलू आलाम हा मुलचेरा येथील रहिवासी असून मुलचेरा तालुक्यातील मोहूर्ली येथील किष्ठू आत्राम यांचा घर जावई म्हणून राहत होता.मिळेल ते काम करून तो उदरनिर्वाह करायचं.मात्र,१८ सप्टेंबर रोजी अचानक पहाटेच्या सुमारास गावालगतच असलेल्या बीएसएनएल टॉवर जवळील खड्ड्यात त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे १७ सप्टेंबर रोजी त्याला सायंकाळच्या सुमारास मोहूर्ली-श्रीनगर मुख्य चौकात काही नागरिकांनी बघितला होता.रात्री नेमकं काय घडलं याचा तपास आता मुलचेरा पोलीस करणार असून शवविच्छेदन अहवाल आल्यावरच हत्या की आत्महत्या याचा उलगडा होणार आहे.त्याच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे.