सिरोंचा:- “एक गाव एक वाचनालय” उपक्रम अंतर्गत प्रत्येक गावात सुसज्ज व अत्याधुनिक वाचनालय सुरू होत असून अभ्यासिकेच्या माध्यमातून अनेक विध्यार्थी मोठ्या पदापर्यंत पोहोचतील असा विश्वास सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.ते पातागुडम पोलिसांच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमात मार्गदर्शन करत होते.अध्यक्ष म्हणून येथील सरपंच सुजाता येलम,सिरोंचा चे ठाणेदार कुमार सिंह राठोड, पातागुडम चे प्रभारी अधिकारी तळेकर,पोलिस निरीक्षक अभिजित तुतुरवाड, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
पुढे बोलताना अतिदुर्गम, आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त भाग म्हणून पातागुडमची ओळख आहे.एवढेच नव्हेतर हे गाव राज्याच्या शेवटचं टोकावर वसलेले असून हाकेच्या अंतरावर छत्तीसगड राज्याची सीमा आहे. या भागातील शालेय विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार यांच्या बौद्धिक कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या वैचारिक क्षमतेत वाढ होऊन त्यांच्या विचारात बळ यावे व नक्षल विचारधारेकडे आकर्षित होऊ नये. तसेच त्यांना घडत असलेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक घडामोडी विविध शासकीय योजनांची अद्यावत माहिती मिळावी, तसेच वाचनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची ओढ निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने “एक गाव एक वाचनालय” हा अभिनव उपक्रम गडचिरोली पोलीस दला मार्फत राबविण्यात येत आहे.त्या अनुषगाने पातागुडम येथे वीर बाबुराव शेडमाके सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले.याचा नक्कीच या भागातील युवक,युवतींना फायदा होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तत्पूर्वी गावात ग्रंथदिंडी काढण्यात आली.यावेळी गावकर्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.तसेच उप पोलीस स्टेशन पातागुडम अंतर्गत समाविष्ठ गावातील नागरिकांसाठी आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी छत्तीसगड राज्यातील भोपालपटनम येथील वैद्यकीय अधिकारी डॉ चंद्रशेखर यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषधी वितरण केले.यावेळी संपन्न झालेल्या विविध कार्यक्रमात या कार्यक्रमासाठी पोलीस कर्मचारी व सीआरपीएफ कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतला.
*वाचनालयात अत्याधुनिक सोयीसुविधा*
पातागुडम गावात सुरू झालेल्या वाचनालयात अत्याधुनिक सोयीसुविधा असून जवळपास २५ ते ३० विध्यार्थी या ठिकाणी अभ्यास करू शकतात अशी व्यवस्था करण्यात आली.सर्वच प्रकारच्या पुस्तकांचे संच,फॅन,लाईट आणि वायफाय सुविधा देण्यात आल्याने या भागातील शालेय विध्यार्थी,सुशिक्षित बेरोजगारांना याचा नक्कीच फायदा होणार.