गडचिरोली:- जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात सणासुदीच्या काळात अवैधरित्या देशी-विदेशी दारूची तस्करी केली जात आहे.विशेष म्हणजे आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांवर बंदी असतानाही दारू तस्करांची मुजोरी सुरू आहे.जड वाहनातून दारू तस्करी होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे जिमलगट्टा पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी नाकाबंदी करत देशी दारुसह तब्बल २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.यातील आरोपी कैलास मडावी याला ताब्यात घेऊन उप पोलिस स्टेशन जिमलगट्टा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जात असल्याचे आढळून आल्यावर अवैध दारू वाहतूक व विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहे. आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर दारू तस्करी होणार असल्याची माहिती मिळताच जिमलगट्टा पोलिसांनी नाकाबंदी करत एम.एच. ४० सी.डी. ५३३० या जड वाहनाची जडती घेतली असता त्या वाहनातून रॉकेट कंपनीच्या संत्रा देशी दारुचे २७० पेटी वाहतूक करताना आढळले.लगेच पोलिसांनी सदर जड वाहनासह आरोपीला ताब्यात घेऊन जिमलगट्टा उप पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला.पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार संत्रा दारूची किंमत १० लाख तसेच सदर वाहनाची किंमत १५ लाख असे एकूण २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर, प्रभारी अधिकारी संगमेश्वर बिराजदार व इतर स्टाफ यांनी केली.सदर गुन्ह्राचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संगमेश्वर बिराजदार हे करीत आहेत.
विशेष म्हणजे अल्लापल्ली ते सिरोंचा
या राष्ट्रीय महामार्गावर खड्डे आणि सुरू असलेला काम यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अडचण होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील या महामार्गावर जड वाहने मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.एवढेच नव्हेतर या वाहनातून अवैध दारू तस्करी होत असल्याचे या कारवाई वरून सिद्ध झाले आहे.मागील काही दिवसंपासून गडचिरोली पोलिसांनी गांजा व अवैध दारू तस्करीवर अंकुश ठेवण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला आहे.असे असताना देखील अवैध दारू तस्करी केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही अवैध दारू अथवा अमली पदार्थांच्या वाहतुकी बद्दल माहिती मिळताच गडचिरोली पोलीस दलाशी संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन गडचिरोली पोलीस दलाकडून करण्यात येत आहे.