भद्रावती : शैक्षणिक अभ्यासक्रम कालबाह्य झालेले आहे. पन्नास वर्षांपूर्वीच्या अभ्यासक्रमात बदलत्या काळानुसार अनुरूप नवीन गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत .यातून परिपूर्णता येईल. त्यासाठी महाविद्यालयात किमान कौशल्यावर आधारित नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबन व स्वयंरोजगार तथा रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यासाठी महाविद्यालयात अनिवार्य सोयी उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन व्यक्तिमत्व विकास करावा असे आवाहन विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान यांनी केले. ते स्थानिक विवेकानंद महाविद्यालय कौशल्य विकास विभाग व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोलर टेक्नॉलॉजीस्ट प्रशिक्षण शुभारंभ कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर भद्रावती येथील उद्योजक गिरीश पद्मावार, विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे कोषाध्यक्ष अभिजीत बोथले, प्रशिक्षण संयोजिका पूजा अंबगुरवार, सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. बंडू जांभुळकर, सामाजिक कार्यकर्त्या माया नारळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, प्रशिक्षक अभिषेक सुरदुसे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आजच्या बदलत्या परिस्थितीत सौर ऊर्जेचे असलेले महत्त्व पटवून दिले. अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करणारे कदाचित पहिले महाविद्यालय असावे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, संचालन डॉ. ज्योती राखुंडे, आभारप्रदर्शन उपप्राचार्य डॉ. सुधीर आस्टुनकर यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शहरातील पालक तथा विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.