गडचिरोली:राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे शनिवारी (२६ ऑगस्ट) एटापल्लीत भव्य स्वागत करण्यात आले. शहरातील मुख्य चौकात जेसीबी मशीन मधून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.क्रेनद्वारे हार घालत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी मंत्री आत्राम यांच्यासोबत त्यांची ज्येष्ठ कन्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम,युवा नेते ऋतुराज हलगेकर,सुपुत्र हर्षवर्धन बाबा आत्राम सहभागी होते.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे मागील चार दिवसांपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अहेरी विधानसभेतील सिरोंचा, अहेरी-भामरागड,मुलचेरा या तालुक्यांचा आढावा घेऊन २६ ऑगस्ट रोजी ते एटापल्ली तालुक्यात पोहोचले.मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा एटापल्ली तालुक्यातील हा पहिलाच दौरा होता.त्या अनुषंगाने एटापल्लीकरांनी त्यांचा भव्य नागरी सत्कार केला.
पारंपरिक आदिवासी रेला नृत्य आणि ढोल पथकासह मुख्य चौकात मिरवणूक काढण्यात आली.शहरातील मुख्य चौकात आगमन होताच त्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर थोर महापुरुषांच्या प्रतिमांना हार अर्पण केला.त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली.जेसीबी मशीन द्वारे एटापल्ली करांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला.
भव्य मिरवणूक दरम्यान विविध ठिकाणी शॉल,श्रीफळ व पुष्गुच्छ देऊन ना.आत्राम यांचा सत्कार करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी करत ‘धर्मराव बाबा आगे बढो.. हम तुम्हारे साथ है..’ अश्या घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे हातात घेत मोठ्या संख्येने खेड्यापाड्यातील नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले होते.यावेळी संपूर्ण एटापल्ली चौक राष्ट्रवादीमय झाल्याचे दिसून आले.
मिरवणुकीमध्ये एटापल्लीकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अमाप उत्साह दिसून आला तर गर्दीमुळे रस्ते फुलून गेले. धर्मराव बाबा आत्राम यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एटापल्ली तालुका मुख्यालयात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नागरी सत्कार कार्यक्रमासाठी एटापल्ली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतला.