गडचिरोली:खेड्यापाड्यातील नागरिकांना तालुका मुख्यालयात आल्यावर विविध कार्यालयात हेलपाटे खावे लागत असल्याची बाब समोर येत असून यानंतर सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या असे स्पष्ट निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले.२६ ऑगस्ट रोजी मुलचेरा येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात विविध विभागांचा त्यांनी आढावा घेतला,यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम,माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,उपसरपंच महेंद्र बाबा आत्राम, तहसीलदार चेतन पाटील,गटविकास अधिकारी,एल बी जुवारे,ठाणेदार अशोक भापकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जावेद शेख,तालुका कृषी अधिकारी विकास पाटील,वैद्यकीय अधीक्षक डॉ ललित मल्लिक, गटशिक्षणाधिकारी गौतम मेश्राम,ग्रामीण पाणीपुरवठा योजना, मुख्यमंत्री तथा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनाचे अधिकारी तसेच आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना पूर्वी आपण मंत्रीपदावर असताना १९९२ मध्ये जिल्ह्यात ४ नवीन तालुक्यांची निर्मिती केली होती.त्यात मुलचेरा तालुक्याचाही समावेश आहे.चामोर्शी तालुक्याचा विभाजन करून मुलचेरा या नवीन तालुक्याची निर्मिती झाल्यावर येथील नागरिकांना चामोर्शी ऐवजी मुलचेरताच सर्व कार्यालय उपलब्ध झाले.तालुक्यात आवश्यक सुविधा मिळाल्याने नागरिकांची मोठी अडचण दूर झाली आहे.मात्र सध्या खेड्यापाड्यातील नागरिकांना त्रास दिला जात असल्याची माहिती समोर येत असून यापुढे कुठल्याही कामानिमित्त तालुका मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांना त्रास होता कामा नये.अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.
तत्पूर्वी विविध विभागांचा त्यांनी आढावा घेतला त्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,वीज वितरण विभाग व वन विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यप्रणालीवर प्रशचिन्ह उपस्थित करतानाच त्यांची कानउघाडणी केली.तर,आढावा सभेत गैरहजर असलेले वीज वितरण विभागाचे उप कार्यकारी अभियंता शिरीष डोंगरे यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.विशेष म्हणजे नागरिकांची समस्या ऐकून त्यांनी थेट आढावा सभेतून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. यावेळी तालुक्यातील विविध गावातील नागरिकांनी अन्न व प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यासमोर समस्या मांडली.त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारात तात्काळ समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले.