सिरोंचा:-अहेरी विधानसभा क्षेत्रातील सिरोंचा हा महत्वाचा तालुका असून या तालुक्याचा विकासासाठी आवश्यक ती निधी उपलब्ध करून दिली आहे.यानंतरही कोट्यवधी रुपयांची निधी देण्यात येणार आहे.त्यामुळे तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांना गती देऊन ते पूर्ण करा असे निर्देश अन्न व प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले.ते २४ ऑगस्ट रोजी सिरोंचा नगर पंचायत कार्यालयात आयोजित आढावा सभेत बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम,सिरोंचा वन विभागाचे उप वनसंरक्षक पूनम पाटे, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना तालुक्याला मुसळधार पावसाचा जबर फटका बसला असून अतिवृष्टीमुळे येथील शेतकऱ्यांचा मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे,मुख्य रस्ते,नदी-नाल्यावरील पूल वाहून गेल्याने मोठी हानी झाली असून सार्वजनिक बांधकाम विभाने याकडे प्राधान्याने लक्ष देऊन त्वरित दुरुस्तीचे काम करावे.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे त्वरित सर्वे करून महसूल विभागाने नुकसान भरपाई द्यावी, आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे काम कासावगतीने सुरू असल्याने या भागातील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.त्यामुळे संबंधित विभागाने याकडे जातीने लक्ष देऊन लवकरात लवकर काम पूर्ण करावे.विकास कामे करताना वन विभागाकडून अडचण निर्माण केले जात आहे.गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो.जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून वन विभागाने शासनाला सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
विशेष म्हणजे सिरोंचा तालुक्यात डेंग्यू सारखे आजार डोकं वर काढताना दिसून येत आहे.अश्या आजारावर प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहून काम करण्याची गरज आहे.आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नागरिकांनी सुद्धा स्वच्छतेवर भर द्यावे आणि कुठलेही आजार झाल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन पुढील उपचार घ्यावा असेही त्यांनी आव्हान केले.तालुक्याचा विकास कामांवर भर देण्यात येणार असून आराखडा सादर करा,तालुक्यातील विविध विभागांना विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
या आढावा सभेत महसूल विभाग,वन विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,पाणी पुरवठा विभाग,वीज वितरण विभाग,पंचायत समिती अंतर्गत येणारे सर्व विभाग,राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी तसेच आदी विभागाचे प्रमुख उपस्थित होते.