गडचिरोली: जिल्ह्यातील शेतकरी जिल्ह्याबाहेर पडून, पारंपारीक शेतीला बगल देत विविध क्लृप्त्यांचा वापर करीत अत्याधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन तेथील परिस्थीतीची, आधुनिक शेती व उपकरणांची पाहणी करून व त्या ज्ञानाचा वापर करून पारंपारीक शेती पध्दतीत बदल करतील तेंव्हा येथील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होईल या उदात्त हेतूने कृषीदर्शन सहल व अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून या अभ्यास दौऱ्यासाठी तब्बल ५० महिला शेतकरी रवाना झाले आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील पोस्टे पेंढरी, कारवाफा, पोमकें कोटगुल, ग्यारापत्ती, सावरगाव, कटेझरी, मुरुमगाव, गोडलवाही, गट्टा (फु.) हद्दीतील एकुण ५० महिला शेतकऱ्यांकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने आतापर्यंत एकुण सातव्या कृषीदर्शन सहलीचे व सन २०२३ मधील तिस-या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
यापुर्वी सुध्दा पोमके कोटमी हद्दीतील ३२ महिला शेतकऱ्यांची तसेच उपविभाग भामरागड हद्दीतील ४० शेतकऱ्यांची त्याप्रमाणे धानोरा, हेडरी व एटापल्ली उपविभागातील ४२ शेतकऱ्यांची तसेच अहेरी, जिमलगट्टा व सिरोंचा हद्दीतील ४६ शेतकऱ्यांची व पेंढरी (कारवाफा) उपविभागातील पोस्टे, उपपोस्टे,पोमकें व पोस्टे धानोरा हद्दीतील ५० शेतकऱ्यांची तसेच उपविभाग धानोरा, कुरखेडा व गडचिरोली पोस्टे,उपपोस्टे,पोमकें हद्दीतील ५० शेतकऱ्यांसाठी कृषी सहल आयोजीत करण्यात आली होती. ही सातवी सहल असून या सहलीमध्ये कुरखेडा, धानोरा व पेंढरी उपविभागातील पोस्टे,उपपोस्टे,पोमकें हद्दीतील अतिदुर्गम भागातील ५० महिला शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे.
सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे मार्गदर्शनात आयोजीत करण्यात आला असून,आज दि. २२/०८/२०२३ पासून दि. २६/०८/२०२३ रोजी पर्यंत ०५ दिवस आयोजीत करण्याचे नियोजन करण्यात येवून, या सातव्या कृषीदर्शन सहल व अभ्यास दौरा कार्यकमास मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या. यावेळी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता,अपर पोलीस अधीक्षक अहेरीअन्य यतिश देशमुख,तसेच प्रफुल पोरेड्डीवार, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय अधिकारी सर्व पोस्टे,उपपोस्टे,पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.
*याठिकाणी देणार भेट*
या सहली दरम्यान सहभागी महिला शेतकरी हे नागपूर, अकोला, शेगाव, जळगाव, अमरावती, वर्धा, वरोरा, भद्रावती जि. चंद्रपूर येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच विविध शेती प्रक्षेत्र यांना भेटी देणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील अकोला व घातखेड येथील कृषी विद्यापिठ्यांना भेटी देणार आहेत. शेतीविषयक अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञान जाणुन घेणार आहेत. यामुळे ते प्रगत तंत्रज्ञानाचे अनुभव आपल्या शेती व्यवसायामध्ये वापरून आपली आर्थिक उन्नती साधुन जिवनमान उंचावतील त्यामुळे जिल्ह्यातील विकासात त्यांचे योगदान असणार आहे.