गडचिरोली:- कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अतिवृष्टी निर्माण झाली आहे.तर आलापल्ली ते मुलचेरा मार्गावरील गोमनी आणि आंबटपल्ली नाल्याच्या फुलावरून पाणी वाहत असल्याने अहेरी – मुलचेरा तालुक्याचा दुसऱ्यांदा संपर्क तुटला आहे.
विविध धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने जिल्ह्यातील सर्वच नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. तेलंगणा राज्यात सलग दोन दिवस अतिवृष्टी झाल्यामुळे राज्याच्या सीमेवर असलेल्या सिरोंचावर जलसंकट ओढवले आहे. मेडी गड्डा धरणाचे सर्व 85 दरवाजे उघडले असून गोदावरी व प्राणहिता नदीच्या जलस्तरही धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासनाने रेड अलर्ट जारी करत शाळा महाविद्यालयांना दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे.
रात्रीपासून दक्षिण भागात मुसळधार पावसाचा कहर बघायला मिळत आहे. या पावसामुळे अहेरी तालुक्यातील नागेपल्ली परिसरात काही प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नागेपल्ली परिसरातील सकल भागात पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. नदी नाले धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी अहेरी ते मुलचेरा या मार्गावरील गोमणी आणि सुंदरनगर जवळील नाल्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून रहदारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. कोपरअली जवळील दीना नदीवर पाण्याची पातळी वाढत असून मुलचेरा ते आष्टी हा ही मार्ग बंद होणार असल्याचे माहिती समोर येत आहे. मूलचेरा तालुक्याचे तहसीलदार चेतन पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांनी परिस्थिती लक्षात घेऊन नाल्याच्या दोन्ही बाजूला बॅरिगेट्स उभे करून आपल्या कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे.गोमनी परिसरातही काही घरात पाणी शिरले असून या भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरूच आहे.