वरोरा : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील पिकांचे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई राज्य शासनाने देण्याची मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्वात पक्षाचे वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांनी केली आहे. याबाबत स्थानिक तहसीलदार यांचे निवेदन देण्यात आले आहे.
दि. १८ जुलै रोजी झालेल्या पावसामूळे तालुक्यातील आजनगाव येथील वामन यशवंत परचाके, प्रकाश प्रल्हाद परचाके, नाना शंकर सिडाम, गोपाल महादेव गेडाम, सुरेश लहानू कुमरे, गजानन रामा कुमरे, रामाजी चंपत कुमरे, संदिप प्रभाकर कुमरे, सुधाकर मारोती बट्टे, नाना विठोबा चिडे इत्यादी शेतकऱ्यांचे घरात, गोठ्यात पाणी घुसल्यामूळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच नदी व नाला लागून असलेल्या शेतामध्ये पाणी साचल्यामुळे शेतमालाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच तालुक्यातील ईतर गावांमध्ये सुध्दा अशाच प्रकारे घरामध्ये, गोठ्यात, शेतामध्ये पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येते. त्यामुळे तालुक्यातील सर्व गावातील क्षतीग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे शेताचे, घराचे, गोट्याचे, पिकाचे तालुक्यातील तलाठ्यामार्फत सर्व्हे करून ताबडतोब त्यांना शासनाची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी आहे.
तसेच मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे घरे व भिंती पडलेल्या असून त्यांचे सर्वे होवून पैसे मंजूर असतांना देखील आजच्या तारखेपर्यंत त्यांना पैसे मिळालेले नाही, यावर तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनातून केलेली आहे.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, गजानन गोवरदिपे, अभिजीत कुडे, निखिल मांडवकर, सुरेश कामडी, गजानन कुरेकार, शामदेव बदकी, आदी उपस्थित होते.