वरोरा:
वरोरा शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या चंद्रपूर नागपूर दुतर्फा महामार्गावरील अब्दुल कलाम ( रत्नमाला) चौक व आनंदवन चौकात ट्रॅफिक सिग्नल लावण्याबाबत रस्ता सुरक्षा समितीकडून मान्यता मिळाली असुन तांत्रिक मंजुरीनंतर कामाला सुरुवात होणार आहे.माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांनी सिग्नलची मागणी करून वर्षभरापासून प्रयत्न चालविले होते.
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत हा प्रश्न चर्चेत आला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सिग्नल लावण्याबाबत सुचना करून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगीतले.
याबाबत वरोरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन भोयर यांच्याशी संपर्क साधला असता बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले असून,या दोन्ही ट्रॅफिक सिग्नलसाठी रस्ता सुरक्षा मधून निधी देण्यात येईल असेही सांगितले. वरोरा नगर परिषदेद्वारे तज्ञ एजंसीद्वारे इस्टिमेटचे काम अंतीम टप्प्यात असून नंतर तांत्रिक मान्यतेला पाठविण्यात येईल असे मुख्याधीकारी भोयर म्हणाले.
आनंदवन चौक व अब्दुल कलाम( रत्नमाला) चौफुलीवर वाहतूकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. वाहतूक नियंत्रण करण्यास वाहतूक पोलिसांनाही त्रासदायक होत असून चौक परिसरात आजतागत अनेक अपघात झाले. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या चौकामध्ये मोठ्या दुर्घटनेची शक्यता लक्षात घेता माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांनी चंद्रपुरचे तत्कालीन पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, तत्कालीन उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे ,मुख्याधिकारी गजानन भोयर यांचेशी चर्चा करून निवेदने देऊन पाठपुरावा केला होता.
कलाम चौक व आनंदवन चौकात ट्रॅफिक सिग्नलला मान्यता देऊन, निधी उपलब्धतेवर माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.