गडचिरोली:- महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील त्यांच्या अहेरी विधानसभा क्षेत्रात प्रथमच आगमनानिमित्त ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.
7 जुलै रोजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे गडचिरोली जिल्ह्यात आगमन झाले.8 जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे ‘शासन आपल्या दारी, उपक्रमासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.मंत्री आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होते.कार्यक्रम आटोपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मुंबईकडे रवाना झाले.त्यांनतर सायंकाळच्या सुमारास मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे अहेरी येथील त्यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले होते.चामोर्शी,आष्टी,मुलचेरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणूक काढत त्यांचे पुष्पगुच्छ,शॉल श्रीफळ देऊन स्वागत केले.
सायंकाळच्या सुमारास आलापल्ली येथे आगमन होताच मुख्य चौकातून भव्य मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर नाचत,फटाक्यांचा आतषबाजी करत स्वागत करण्यात आले.त्यानंतर नागेपल्ली येथे मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.रात्री 10 वाजताच्या सुमारास ते अहेरी मुख्यालयात पोहोचले. यावेळी दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी गांधी चौक येथे आयोजित सभेला त्यांनी संबोधित केले. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या रूपाने गडचिरोली जिल्ह्याला पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने अहेरी येथील राजनगरीत एकच जल्लोष करण्यात आला. विविध संघटना तसेच विविध समाजाकडून पुष्पगुच्छ,शॉल श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
राजवाड्यात कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे कुटुंबीयांकडून मंत्रौच्चार करत औक्षण
अहेरी येथील गांधी चौकात आयोजित सभेला संबोधित केल्यावर मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे आपल्या निवासस्थानाकडे रवाना झाले. राजवाडा परिसरात त्यांचे आगमन होताच घरच्या सदस्यांनी मंत्रोच्चार करत फुलांचा वर्षाव करत औक्षण करण्यात आले. एवढेच नव्हे तर घरच्या मंडळींनी धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते केक कापून सर्वांचे तोंड गोड करत आनंद द्विगुणीत केला.यावेळी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम,सिनेट सदस्य तनुश्री आत्राम,युवा नेते ऋतुराज हलगेकर,माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,डॉ.सौ.मिताली आत्राम,रामेश्वर बाबा आत्राम,जे डी सडमेक तसेच राज परिवारातील आदी सदस्य उपस्थित होते.