हिंगणघाट:- गतिमान प्रशासन होण्यासाठी हिंगणघाट उपविभागाला जिल्ह्याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी प्रहारचे पूर्व विभाग प्रमुख गजू कुबडे यांनी आज दि ७ जूनला एका निवेदनातून केलेली आहे.
निवेदन
निवेदनातून म्हटल्या प्रमाणे, विदर्भातील सर्व तालुक्यात मोठा हिंगणघाट तालुका व हा उपविभाग जिल्ह्यात आर्थिक दृष्टया सक्षम दिसून येत असला तरी औद्योगिक, शैक्षणिक, व आरोग्य सुविधा विषयक बाबतीत माघारलेला असून जल जमीन वीज रस्ते रेल्वेची उपलब्धतता असूनही प्रचंड बेरोजगारी ने ग्रासला आहे. प्रशासन गतिमान करण्यासाठी व शासन योजना, लोकहिताचे निर्णय
सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्याची अंमलबजावणीसाठी लहान लहान जिल्हे व तालुके अस्तित्वात येणे ही खरी तर काळाची गरज आहे. त्यामुळेच या उपविभागातील
अल्लीपुर, मांडगाव, व सिंदी रेल्वे या मोठया गांवाना तालुक्याचा तर हिंगणघाट ला जिल्ह्याचा देण्याची गरज आहे.
इंग्रज काळात नागपूर नंतर मोठया 10 हजार कामगारांना रोजगार देणाऱ्या या परिसराला महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर घरघर लागली. ते दोन्हीही मोठे कापड उद्योग कायमचे बंद झाले. वीज, पाणी, रेल्वेमार्ग, राष्ट्रीय महामार्ग व अनेक राज्यरस्ते या सर्व बाबी उपलब्ध असल्यामुळे हिंगणघाटला जिल्ह्याचा दर्जा मिळावा, ही मागणी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून जुनीच आहे.
लोकसंख्या सातत्याने वाढत असल्याने वाढत्या लोकसंख्येमुळे सोयी-सुविधांचा अभाव आहे. अशास्थितीत नागरिकांना चांगल्या सोयी- सुविधा देता याव्यात याकरिता वर्धा जिल्ह्यासह लगतच्या नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांचे विभाजन करून, या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेलगत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा देण्याची गरज आहे.
या तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा का द्यावा याबाबत माहिती देतांना गजू कुबडे यांनी निवेदनात लिहिल्या नुसार, हिंगणघाट हे वर्धा, नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ या जिल्ह्यांच्या मध्येभागी असून राष्ट्रीय महामार्ग, राज्यमहामार्ग,व रेल्वेने जुळून आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा व चिमूर तालुक्याच्या सीमा हिंगणघाट पासून १५ ते २० किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय नागपूर जिल्ह्याचा उमरेड तालुकाही हिंगणघाट समुद्रपूरच्या लगत आहे. यवतमाळ जिल्ह्याचा परिसर वणी, केळापूर तालुक्यासह आंध्रा व तेलंगणा राज्याच्या सीमेपर्यंत विस्तारीत आहे. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांना गरजेनुसार नियमित कामाकरिता हिंगणघाटलाच यावे लागते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे चारही जिल्ह्यातील टोकावरच्या गावांना मुख्यालयी जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
विदर्भातील नागपुर, यवतमाळ, चंद्रपुर, वर्धा चारही जिल्ह्याच्या मध्यभागी असलेल्या हिंगणघाटला यासर्व जिल्ह्याचा मोठा ग्रामीण भाग जुळला आहे. शैक्षणिक सोयी सुविधा नसल्याने बेरोजगारी कायम आहे. १२ वी नंतरच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाशिवाय अन्य कोणतीही उच्च शिक्षणाची सोय नाही. फार्मसी, कृषी, विधी, अभियांत्रिकी किंवा अन्य व्यावसायिक शिक्षणासाठी व रोजगारासाठी वर्धा, नागपूर, पुणे, मुंबईचा रस्ता पकडावा लागतो. म्हणूनच सर्वांगीण विकासासाठी हिंगणघाटला जिल्ह्याचा दर्जा द्यावा अशी मागणी आहे
येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सुरु झाल्यानंतर येथील 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळून 400 खाटांच्या रुग्णालयाला मंजूरी मिळाली आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी नागरिकांचा लढा सुरूच आहे. त्यामुळे आता जिल्हा निर्मितीच्या आशेचा किरण दिसू लागला आहे.
यवतमाळ जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 13584 चौ. कि.मी., चंद्रपूर 11443 जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र चौ. कि.मी., नागपूर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 9897 चौ. कि.मी., वर्धा जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 6310 चौ. कि.मी.आहे. हिंगणघाट पासून चंद्रपुर जिल्ह्याची सीमा 15 किमी तर नागपूर व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमा 30 किमी आहे. नागपूर जिल्ह्यातील सोनेगाव चौरस्ता, बेला, सिर्सी, वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे 40 किमी.चे आत, समुद्रपूर 16 किमी, चिमूर 58 किमी, वरोरा नागरी मांढळी मार्गे 40 किमी आहे. राळेगाव 50 किमी तर वणी वरोरा मार्गे 70 किमी, वडकी मार्गे मारेगाव 68 किमी, पांढरकवडा 75 किमी चे आत आहे. त्यामुळे लगतच्या तालुक्यातील कांही भाग हिंगणघाट च्या बाजारपेठ चा एक भाग असल्याने दैनंदिन गरजा साठी तेथील नागरिकांना हिंगणघाट जवळ असले तरी प्रशासकीय कामकाजा साठी त्या त्या जिल्ह्याचे मुख्यालय अधिक अंतरावर व गैरसोईचे आहे.
अशास्थितीत नागपुर, यवतमाळ, चंद्रपुर, वर्धा चारही जिल्ह्याच्या मध्यभागी असलेल्या हिंगणघाटला जिल्ह्याचा दर्जा देवून परिसरातील सर्व जनतेला न्याय द्यावा अशी नागरिकांसह आमची मागणी असून याकडे अजूनही दुर्लक्ष झाल्यास आंदोलना शिवाय मार्ग राहणार नाही अशा स्थितीत त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असा इशारा गजू कुबडे यांनी निवेदनातून दिलेला आहे
निवेदन देतेवेळी सूरज कुबडे,अजय लढी सतीश गलांडे,सुधीर मोरेवार,अमोल वाघमारे,मुन्ना ठाकूर,मयूर पुसदेकर,आकाश तळवेकर,पवन नारायने,सागर आत्राम,हनुमान भाजीपाले बाळू रोहित,गोलू उजवणे करणं विटाळे उपस्थित होते.