आनंदवन (आशीष घुमे): बाबा आमटे यांच्या महारोगी सेवा समिती, वरोरा द्वारा संचालित निजबल अंतर्गत संधिनिकेतन अपंगांची कर्मशाला, आनंदवन येथे दिव्यांग व्यक्तिना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बोर्डाच्या खाजगी विद्यार्थी परीक्षा योजने अंतर्गत (१७ नंबर फॉर्म) १० वी आणि १२ च्या परीक्षेला बसविले जाते. सदर विद्यार्थ्यांना विनामूल्य निवासी सुविधेसह नियमित शिकवणी वर्गही घेतले जातात. यावर्षी २१ कर्णबधीर व ०६ अंध असे एकूण २७ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले. सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली . निखिल चुलाराम नागोशे या अंध विद्यार्थ्याने ६५ टक्के गुण मिळवित प्रथम स्थान पटकावले तर निलेश पारसकर या मूकबधिर विद्यार्थ्याने ६४.३३ टक्के गुण मिळवित सदर प्रवर्गात प्रथम क्रमांक घेतला. व्यवस्थापकीय अधीक्षक रवींद्र नलगिंटवार यांचे नेतृत्वात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात बारावी परीक्षा समन्वयक प्रवीण ताठे, आशीष येटे, नितीन आवरी,प्रीती पोहाने या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. परीक्षा व पूर्व तयारी करीता आनंदनिकेतन कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा.राधा सवाने, हिरालाल लोया विद्यालयाचे उपप्राचार्य जोशी सर यांचे बहुमोल योगदान व मार्गदर्शन मिळाले. सदर यशाकरीता महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, कार्यकारी विश्वस्त कौस्तुभ आमटे, पल्लवी आमटे, डॉ. विजय पोळ, सुधाकर कडू , सदाशिव ताजने, माधव कवीश्वर यांसह अनेक मान्यवरांनी, आनंदवनवासियानी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.