गडचिरोली:गोंडवाना विद्यापीठाची वार्षिक अधिसभा रविवारी,१२ मार्च रोजी पार पडली. या सभेतच व्यवस्थापन परिषदेची निवडणूक झाली. त्यात अभाविप, शिक्षण मंचाचे प्रशांत दोंतुलवार, तर यंग टिचर्सचे विवेक गोर्लावार आणि लेमराज लडके विजयी झाले आहेत. प्राचार्य गटात अभाविप व मंचचे डॉ. अरूण प्रकाश यांच्या विरोधात यंग टिचर्सचे डॉ. लेमराज लडके, तर शिक्षक गटात अभाविप व मंचचे डॉ. रूपेंद्र कुमार गौर यांच्याविरूध्द यंग टिचर्सचे डॉ. विवेक गोर्लावार आणि पदवीधर गटात अभाविप व मंचचे प्रशांत दोंतुलवार यांच्या पुढे यंग टिचर्सचे दिलीप चौधरी उभे ठाकले होते. तिन्ही जागेवर थेट लढत होती. यातून प्रशांत दोंतुलवार, विवेक गोर्लावार,लेमराज लडके विजयी झाले.
संस्थाचालक, राखीव पदवीधर, राखीव शिक्षक आणि गटाच्या निवडणुकीसाठी केवळ एकच अर्ज आल्याने अनुक्रमे अभाविप व मंचचे स्वप्निल दोंतुलवार, गुरूदास कामडी आणि यंग टिचर्सचे प्रा. डॉ. संजय गोरे यांची आधीच अविरोध निवड झाली होती. उर्वरित तीन जागांसाठी आज निवडणूक झाली.
व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीसह विद्या परिषदेसाठीही सिनेटमध्ये निवडूण आलेल्या एका संस्थाचालकाची निवड करायची होती. मात्र यातही केवळ एकच नामांकन असल्याने आपसुकच स्वप्निल दोंतुलवार यांची या जागेवर अविरोध निवड झाली. तर स्थायी समितीत सिनेटमधील प्राचार्यांच्या एका जागेसाठी अभाविप व मंचचे डॉ. संजय सिंग यांच्याविरूध्द यंग टिचर्सचे डॉ. संभाजी वरखड यांच्यात निवडूण झाली आणि डॉ. वरखड विजयी ठरले. प्राध्यापक गटात अभाविप व मंचचे सुधीर हुंगे यांच्या विरूध्द यंग टिचर्सचे डॉ. प्रवीण जोगी उभे होते. यात हुंगे पराभूत झाले. पदवीधरांचे प्रतिनिधी म्हणून झालेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत अभाविप व मंचचे धमेंद्र मुनघाटे यांनी यंग टिचर्सचे दीपक धोपटे यांचा पराभव केला. त्याचप्रमाणे तक्रार निवारण समितीत अभाविप व मंचच्या शिला नरवडे आणि यंग टिचर्सचे डॉ. मिलींद भगत यांच्यात लढत होऊन शीला नरवाडे विजयी झाल्या. तसेच तक्रार निवारण समितीत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यां मधून गोंडवाना विद्यापीठाचे सतीश पडोळे अविरोध आले.