गडचिरोली:- अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी 22 फेब्रुवारी रोजी भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे जाऊन डॉ. प्रकाश आमटे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
ज्येष्ठ समाज सेवक आणि गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम हेमलकसाचे आदिवासी उत्थानासाठी उभारलेल्या लोकबीरादरी प्रकल्पाचे प्रमुख डॉ. प्रकाश आमटे तीन महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर रक्ताच्या कर्करोगावर मात करून नुकतेच काही महिन्यापूर्वी हेमलकसा येथील प्रकल्पात परतले. मात्र,कामाच्या व्यस्ततेमुळे आ.धर्मराव बाबा आत्राम त्यांना भेटू शकले नाही.
आ. धर्मराव बाबा आत्राम आज भामरागड तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली तालुका मुख्यालयात वार्षिक आमसभा पार पडली. वार्षिक आमसभा आटोपून अहेरीकडे परत येत असताना त्यांनी आवर्जून हेमलकसा येथे जाऊन डॉ. प्रकाश आमटे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.यावेळी डॉ आमटेंनी सुद्धा आ धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रकृती बाबत विचारपूस केली.सोबतच डॉ मंदाकिनी आमटे,डॉ दिगंत आमटे,डॉ अनघा आमटे,समीक्षा आमटे यांच्याशीही गप्पा करत सुरू असलेल्या आरोग्य व शैक्षणिक कामावर चर्चा केली.तसेच पुढील कार्यास शुभेच्छा दिली.यावेळी आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्यासोबत जेष्ठ कन्या माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम,सुपुत्र, माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम उपस्थित होते.