गडचिरोली:- सिरोंचा तालुका मुख्यालयात पार पडलेल्या वार्षिक आमसभा आरोग्य विभागावर चांगलीच गाजली असून रिक्तपदे आणि प्रतिनियुक्तीवर आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी संताप व्यक्त करताना नागरिकांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याबाबत निर्णय घेण्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सक्तीचे निर्देश दिले आहे.अहेरी विधानसभा क्षेत्रात सध्या वार्षिक आमसभा सुरू असून सोमवार 20 फेब्रुवारी रोजी राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या सिरोंचा तालुका मुख्यालयातुन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली पहिली आमसभा पार पडली.यावेळी आमदार आत्राम यांनी निर्देश दिले.
या वार्षिक आमसभेचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम,युवा नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ऋतुराज हलगेकर, सिरोंचाचे तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, गटविकास अधिकारी ए. एच.पटले, माजी उपसभापती कृष्णामूर्ती रिकूला, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, नगरसेवक सतीश भोगे, नगरसेवक सतीश राचर्लावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सत्यम पिडगु, प्रतिष्ठित नागरिक विश्वेश्वरराव कोंड्रा, माजी नगरसेवक रवी रालाबंडीवार आदी उपस्थित होते.
वार्षिक आमसभेत आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सुरुवातीला तालुक्यातील खेड्यापाड्यातून आलेल्या गोरगरीब जनतेचे निवेदन स्वीकारले व समस्या जाणून घेतली. यामध्ये विशेषतः आरोग्य विभाग, पंचायत विभाग तसेच वीज वितरण विभागाविरोधात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निवेदनातून तक्रार दिली, विशेष म्हणजे सध्या मोठ्या प्रमाणात घरकुलचे काम सुरू असून घरकुल बांधकामसाठी रेती उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून त्वरित नागरिकांची समस्या सोडविण्याबाबत निर्देश दिले. तालुक्यातील आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून झिंगानूर, बामणी, मोयाबीनपेठा,अंकीसा, पेंटीपाका आदी प्राथमिक आरोग्य केंद्र तथा उपकेंद्रात असलेले रिक्त पदे आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेली प्रतिनियुक्ती यावर आमदार आत्राम यांनी संताप व्यक्त करतानाच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या संदर्भात योग्य निर्णय घेण्याचे संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
विशेष म्हणजे सिरोंचा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्याची ओरड आहे.एवढेच नव्हेतर पंचायत विभागातील ग्रामसेवक मुख्यालयात हजर नसल्याचे नागरिकांनी तक्रार केली. यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना आपापल्या नेमणुकीच्या ठिकाणी म्हणजेच मुख्यालयी हजर राहून सेवा बजाविण्याचे निर्देश दिले. तसेच यापुढे नागरिकांची तक्रार येणार नाही त्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्याचे याची काळजी घ्या असेही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. वीज वितरण विभागाला शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, त्या अनुषंगाने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सिरोंचा तालुक्यातील क्रीडा संकुल परिसरात आयोजित वार्षिक आमसभेला तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.