गडचिरोली (आशिष घुमे): नवीन शैक्षणिक धोरणावर टीका करण्यापेक्षा प्राध्यापकांनी आहे ते बदल स्विकारले पाहिजे. मानवी कल्याण व समाजाच्या विकासासाठी भाषेच्या प्राध्यापकांनी प्रयत्नशील राहावे. कारण समाजाच्या प्रगतीत भाषेच्या प्राध्यापकांची भूमिका महत्त्वाची असते. भारत हा अनेक पैलूंनी वैविध्यपूर्ण असा बहुभाषिक देश आहे. या देशात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. येथे इतकी विविधता आहे की, एकाच देशात फिरले तरी अनेक देशात फिरल्याची अनुभूती येते. येथील लोकांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम आणि जिव्हाळा आहे. मात्र मागील काही वर्षांपासून अलीकडे माणूस एकमेकांचा द्वेष करत असल्याच्या बातम्या आपण वर्तमानपत्रातून वाचत असतो. अशा परिस्थितीत संकुचित विचार करून आपल्याला प्रगती साधता येणार नाही. सगळ्यांना विकासाभिमुख विचार करावा लागेल. आपली परंपरा सर्वधर्मसमभाव जपणारी आहे. एकत्र राहण्याची आपली संस्कृती आहे. त्यामुळे एकमेकांवर प्रेम करा. आपण देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जन्मलो असलो तरी आपण माणूस म्हणून एक आहोत. अशी भावना जपली तरच देश पुढे जाईल. मराठी भाषेच्या प्राध्यापकांनी देशभक्ती, देशप्रेम निर्माण करणारे अभ्यासक्रम तयार केले पाहिजे आणि या क्षेत्राचे पावित्र्य राखले पाहिजे असे विचार शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील मराठी विभागप्रमुख प्राध्यापक तथा समीक्षक डॉ. नंदकुमार मोरे यांनी व्यक्त केले.
ते दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचलित श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयात द्वारे आयोजित मराठी प्राध्यापक परिषदेच्या ३३ व्या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थाध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे होते. यावेळी मंचावर समीक्षक डॉ. नंदकुमार मोरे यांच्यासह अधिवेशनाध्यक्ष डॉ. श्रीकांत नाकाडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथील सेवानिवृत्त मराठी विभागप्रमुख तथा साहित्यिक डॉ.प्रमोद मुनघाटे, मराठी प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष डॉ. गणेश मोहोड, कार्याध्यक्ष डॉ. हिराजी बनपूरकर, सचिव डॉ. राजेंद्र वाटाणे, उपप्राचार्य प्रा. पी. एस. खोपे, संयोजक डॉ.नरेंद्र आरेकर उपस्थित होते. यावेळी बोलताना पूर्वाध्यक्ष डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी सांगितले की, “इतर शास्त्रे जग कसे आहे हे सांगत असतात. पण भाषा मात्र माणूस कसा असावा? जग कसे असावे? हे सांगत असते. म्हणून या नव्या शैक्षणिक धोरणात भाषेच्या प्राध्यापकांची जबाबदारी अधिक वाढलेली आहे. भाषेच्या प्राध्यापकांनी समाजात प्रेमाची भावना वाढेल असे शिकविले पाहिजे आणि ती भावना लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. त्यासाठी अभ्यास मंडळांनी अभ्यासक्रम बनवताना काळजी घेतली पाहिजे” असे विचार मांडले. यावेळी अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी सांगितले की, पूर्वी मराठीचा प्राध्यापक हा महाविद्यालयाचा कणा होता. परंतु महाविद्यालयांचे मूल्यांकन करणाऱ्या संस्थांनी इंग्रजी भाषेचे उगाचच महत्व वाढवून त्यांचे महत्त्व कमी केले आहे. आता प्राध्यापकांनी परिवर्तनशील बनून नवीन बदल स्वीकारले पाहिजे. आपण मिळविलेल्या ज्ञानाचा फायदा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कसा होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. उद्घाटनपर सत्राचे संचालन प्रा. मोक्षदा मनोहर, प्रास्ताविक डॉ. नरेंद्र आरेकर, आभारप्रदर्शन डॉ. हेमलता उराडे यांनी केले. दोन दिवशीय या अधिवेशनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील मराठी भाषेच्या अनेक प्राध्यापकांनी नोंदणी करून आपला सहभाग नोंदविला.या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहे.