गडचिरोली:- मराठी नाटकांना प्रेक्षक नाही, नाटकांना होणारी गर्दी कमी होत चालली आहे, मराठी रंगभूमी टिकणार कशी, अशी ओरड गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत असताना अलीकडच्या काळात मराठी रंगभूमीवरील अनेक नाटकांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला आहे.नाट्य रसिकांची पावले नाट्यगृहाकडे वळविण्यात नाटकांना यश आल्याचे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.कोटगल येथे तन्मय नाट्य रंगभूमी वडसा द्वारा प्रस्तुत ‘डंख सुहासिनीचा’ या तीन अंकी नाट्य प्रयोगाचा उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सह उद्घाटक म्हणून काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ नामदेव किरसान, डॉ नितीन कोडवते,अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, उपाध्यक्ष डॉ दीप्ती श्रीकांत माटे, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर,से.पो.निरीक्षक दामदेव मंडलवार,चेतन पेंदाम, निधी गद्देवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना विविध माध्यमांचे आक्रमण, सशक्त नाट्य निर्मितीचा व दर्जेदार नाट्यगृहांचा अभाव आणि रसिकांची उदासीनता अशा कारणामुळे मराठी मनाचे वैभव असलेले मराठी नाटक गेल्या काही वर्षात मागे पडत असल्याचे चित्र होते. हल्ली नाटक बघायला कोणी जाते का संशोधनाचा विषय झाल्याचे बोलले जात होते. मात्र रसिकांमुळे नाटकाला पुन्हा वैभव प्राप्त झाल्याचे दिसून येत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपापली मत मांडली.यावेळी कोटगल परिसरातील नाट्य रसिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.