चंद्रपूर :- 24 सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजना दिवस या दिनाचे औचित्य साधून शनिवार 24 सप्टेंबरला आनंदनिकेतन महाविद्यालयात हा दिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून , महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मृणाल काळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विभागीय समन्वयक डॉ.रंजना लाड यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.
कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन व राष्ट्रीय सेवा योजना गीताने झाली.या प्रसंगी सुधाकर कडू यांनी स्वयंसेवक हा समाजातील वेदनेशी नातं जोडणारा असावा आणि वेदनेला न्याय देण्याची दृष्टी त्याच्याच असली पाहिजे असे मत व्यक्त केले.जो उत्स्फूर्तपणे काम करतो व पडेल ते काम करतो तो खरा कार्यकर्ता अशी कार्यकर्त्याची भूमिका ही त्यांनी या प्रसंगी विशद केली.युवकांनी विचारांची ऊर्जा समाजाला द्यावी हे सांगताना त्यांनी आनंदवन हा विचारांचा,सेवेचा,कार्याचा एक मोठा ग्रंथच आहे,त्याचा आधार घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
विभागीय समन्वयक डॉ.रंजना लाड यांनीही स्वयंसेवकांचे योगदान काय असले पाहिजे यावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपातून प्राचार्य डॉ.मृणाल काळे यांनी महाविद्यालयाला सेवेचा एक इतिहास आहे,रासेयो च्या विद्यार्थ्यांनी हा वसा पुढे नेला पाहिजे असे मत व्यक्त केले.
प्रास्ताविकेतून राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्या मागची भूमिका कार्यक्रम अधिकारी प्रा.मोक्षदा नाईक यांनी विशद केली.संचालन व आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आदित्य कडबे व वैष्णवी रणदिवे यांनी केले. कार्यक्रम अधिकारी प्रा.सुरेश राठोड यांचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभले.याकार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना चे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.