चंद्रपूर (सुरज घुमे ) :- सप्टेंबर महिना हा कर्णबधिर व्यक्तींच्या जागरूकतेचा महिना म्हणून जगभरामध्ये ओळखला जातो. सप्टेंबर महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह, जागतिक कर्णबधिर दिन, जागतिक सांकेतिक भाषा दिन हे प्रामुख्याने जगभरातील कर्णबधिर समुदाय साजरा करतात.
यावर्षी १९ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर, २०२२ हा “आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह” म्हणून साजरा होत आहे. तसेच दरवर्षी २३ सप्टेंबर रोजी “आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन” साजरा केला जातो.
जगभरातील कर्णबधिर समुदायाच्या जवळपास एकूण ३०० सांकेतिक भाषांपैकी एक असलेली “भारतीय सांकेतिक भाषा” (Indian Sign Language) हि कर्णबधिर व्यक्तींची प्राथमिक भाषा आहे. हि एक नैसर्गिक दृश्य-मॅन्युअल भाषा असून ती कर्णबधिर आणि श्रवणक्षम दोन्ही समुदायां द्वारे वापरली जाते.
सांकेतिक भाषेत उपलब्ध दर्जेदार शिक्षणासह सांकेतिक भाषा आणि सेवा हे कर्णबधिर व्यक्तींच्या वाढ आणि विकासासाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास साध्य करण्यासाठी महत्वपूर्ण आहे. कर्णबधिरत्व हे दिव्यांगत्व असणे म्हणजे कमतरता नसून, त्याकडे भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेचा भाग म्हणून बघितले गेले पाहिजे.
संयुक्त राष्ट्र (UN) आणि वर्ल्ड फेडरेशन ऑफ द डेफ (WFD) यांनी दिलेल्या “सर्वांसाठी समावेशक समुदाय तयार करणे” (Building Inclusive Communities for All) या संकल्पनेवर आधारित आनंदवनातील “निजबल” अंतर्गत ‘संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा’ येथे “आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह” साजरा केला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत कर्मशाळेतील कर्णबधिर विद्यार्थ्यांनी भारतीय सांकेतिक भाषेशी ओळख करून देणारा जागरूकता कार्यक्रम वरोरा शहरातील विविध माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये येथे सादर केला. कार्यक्रमा अंतर्गत कर्णबधिर विद्यार्थ्यांनी श्रवणक्षम विद्यार्थी व उपस्थितांना त्यांच्या सांकेतिक भाषेचे धडे दिले तसेच त्यांच्यातील नृत्य व मूकनाट्य अभिनयाचे कौशल्य सादर केले. श्रवणक्षम विद्यार्थ्यांना सांकेतिक भाषा शिकवून त्याच भाषेतून त्यांच्याशी संवाद साधण्याचे कर्णबधिर विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि आत्मविश्वास पाहून उपस्थित सर्व श्रवणक्षम विद्यार्थी कर्णबधिर विद्यार्थ्यांकडे नकळत आकर्षिले गेले आणि त्यांच्याशी जोडले गेले. श्रवणक्षम व्यक्तींशी मैत्री, सांकेतिक भाषेतून त्यांच्याशी थेट साधलेला संवाद आणि सर्वसामान्य मुख्य प्रवाहाने कर्णबधिरांची सांकेतिक भाषा शिकून घेण्यात दाखविलेली रुची, त्यांच्या दिशेने टाकलेले एक पाऊल हा सर्व अनुभव कर्णबधिर विद्यार्थांना सर्वार्थाने संपन्न करणारा ठरला. या सप्ताहात एकूण १०००+ श्रवणक्षम व्यक्तींच्या समुदायापर्यंत हा जागरूकता कार्यक्रम घेऊन हे कर्णबधिर विद्यार्थी पोहोचले.
२३ सप्टेंबर, जागतिक सांकेतिक भाषा दिनी WFD यांनी सुचविलेल्या “सांकेतिक भाषा आम्हाला एकत्र करतात” (Sign Languages Unite Us!) या धर्तीवर आधारित निजबल येथे कर्णबधिर विद्यार्थ्यांकरिता विविध खेळ व स्पर्धा चे आयोजन करण्यात आले. विशेष बाब म्हणजे हे सर्व खेळ व स्पर्धा “भारतीय सांकेतिक भाषा” (ISL) याच विषयाला अधोरेखित करणारे होते. कर्णबधिरांच्या बोलक्या जगातील सळसळता उत्साह आणि भाषिक विविधतेने नटलेल्या या दिवशी उपस्थित सर्व शिक्षक आणि कर्णबधिर विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला.
श्रद्धेय बाबा आणि साधना ताई आमटे यांना अभिप्रेत असणारे “निजबल” हे सर्वांसाठी समावेशक समुदाय तयार करण्याच्या दिशेने आपली वाटचाल करीत आहे. गेली ५ दशके संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा हि दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणा वर काम करते आहे. आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताहाचे औचित्य साधत अश्विनी आंधळकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त श्री. कौस्तुभ आमटे, पल्लवी आमटे आणि संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा येथील व्यवस्थापकीय अधीक्षक रवींद्र नलगिंटवार यांच्या मार्गदर्शनात सर्वत्र राबविण्यात आला. कर्मशाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे या उपक्रमाला अमूल्य योगदान लाभले.