विविध राजकीय तथा सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी तथा नागरीक उपस्थित
भद्रावती : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरातील मुख्य मार्गावरून आज (दि.१५) ला १०० मीटर लांबीची तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅली दरम्यान शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले.
या रॅलीमध्ये सामाजिक कार्यकर्ते रवि शिंदे, प्रशांत शिंदे, ठाणेदार गोपाल भारती, सुनील नामोजवार, ज्ञानेश्वर डुकरे, सुधीर सातपुते, डॉ. विवेक शिंदे, संतोष आमने, रोहन कुटेमाटे, बंग, हर्षल शिंदे तथा शहरातील विविध राजकीय तथा सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, व्यापारी, विद्यार्थी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी स्वातंत्र्य दिन चिरायू होवो, ही भावना घेवून देशातील शेवटच्या तबक्यातील व्यक्ती पर्यंत खरे संविधानरुपी स्वातंत्र्य पोहोचावे ही प्रार्थना करण्यात आली. शहरातील सामाजिक सौहार्द व शांतता कायम राहावी. तिरस्कार, घृणा, आकस, लोभ व धमकी या विरोधात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा व क्षमाभाव नांदावा, असे सुर रॅलीतून निघाले.
स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना व विशेषत: वरोरा-भद्रावती तथा चंद्रपूर जिल्हावासियांना शुभेच्छा प्रदान करुन तथा राष्ट्रगीताने रॅलीची समाप्ती झाली.