वरोरा व भद्रावती तालुक्यातील सहकारी संस्था व ग्रामपंचायत पाठवणार शासनाला ठराव
नियोजन सुरू …अन्यथा वरोरा विधानसभा क्षेत्रात होईल मोठे आंदोलन
भद्रावती : मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेले असल्यामुळे पिककर्ज माफ करुन नवीन पीक कर्ज देण्यात यावे या विषयावर वरोरा व भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांची सभा आज (दि.१) ला स्थानिक रवि शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडली.
व्हिडीओ न्यूज
या सभेमध्ये वेकोली क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या गावातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची नुकसान भरपाई वेकोलीने सी.एस.आर. फंडातून करावी तर इतर गावातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची नुकसान भरपाई शासनाने करावी, तथा पीक कर्ज माफ करुन नवीन पीक कर्जाचा पुरवठा त्वरीत करावा, अशी मागणी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवी शिंदे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी केली. यासाठी आता दोन्ही तालुक्यातील सहकारी संस्था व ग्रामपंचायत ठराव घेवून जिल्हाधिकारी मार्फत राज्य शासनास पाठविणार आहेत. याबाबत नियोजन सुरु केलेले आहे.
याअगोदर वरोरा-भद्रावती तालुक्यातील पूरपरिस्थिती ही वेकोलीची देण आहे, असा आरोप करुन पूरग्रस्त गावांतील पुरबाधित हजारो शेतकऱ्यानी उचललेल्या पीक कर्जाची वेकोली प्रशासनाने सीएसआर फंडातून नुकसान भरपाई करावी, अशी मागणी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवी शिंदे तथा जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सुर यांनी केलेली होती, हे विशेष. या सभेत वेकोलीच्या बेजबाबदार धोरणामुळे होत असलेल्या नुकसानीची भरपाई यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या सभेत ठरल्याप्रमाणे बँक ही संस्था शेतकऱ्यांची असुन शेतकरी हा सहकारी संस्था व बँकेचा आत्मा आहे आणि शेतकऱ्यांची शेती ही संपुर्णतः बँकेच्या पिककर्जावर अवलंबुन असल्याने अतीवृष्टीमुळे शेतक-यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी हा शेतीव्दारा आपल्या परिवाराची उपजीवीका चालवितो. शेतक-यांच्या शेती व्यवसायातुनच जगाच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागत असतात. म्हणजेच शेतकरी हा एक उद्योजकच आहे. आज शेतक-यांची परिस्थिती अतीवृष्टीमुळे व अस्मानी संकटामुळे दयनिय झालेली आहे. त्यामुळे त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. या अतीवृष्टीमुळे शेतकरी हा स्वतः उपाशी मरत असुन त्यांना शेतीकरीता कामी येणाऱ्या जनावरांनासुध्दा चा-याची व्यवस्था करण्याची त्याची ऐपत राहीलेली नाही. चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असुन सदर उद्योग उभारणीसाठी शेतकऱ्यांच्या शेतजमीनी संपादीत करण्यात आलेला असुन त्यावरच मोठ-मोठे उद्योग उभारण्यात आलेले आहे. सदर उद्योग धंद्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर खनिज निधी उपलब्ध होत असतो परंतु सदर निधी हा शेतकऱ्यांवर खर्च होतांना दिसुन येत नाही. तसेच वेकोलीच्या ढिगाऱ्यामुळे गावालगत असलेल्या नदीला मोठ्या प्रमाणावर पुर आल्यामुळे झालेल्या नुकसानीस वेकोलीमार्फत करण्यात आलेले ओवरबर्डन अती प्रमाणावर जबाबदार आहे. त्यामुळे वेकोलीच्या सि.एस.आर. फंड या निधीमधुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वैयक्तिक आर्थिक मदत करण्यात यावी. सोबतच इतर गावातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज शासनाने १००% माफ करावे तथा नवीन पीक कर्ज त्वरीत उपलब्ध करुन द्यावे, अशा मागणीचा ठराव घेण्यात आला.
वरोरा व भद्रावती तालुक्यातील सहकारी संस्थेच्या वतीने नियमित व थकित शेतकऱ्यांचे रेकॉर्ड उपलब्ध करुन देत या शेतक-यांचे संपुर्ण नियमीत व थकित पिककर्ज १००% माफ करावे, व त्यांना शेतीकरीता नविन पिककर्ज तात्काळ देण्याकरीता कार्यवाही करावी, अशी मागणी रवि शिंदे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी केली आहे. सदर मागणी मान्य न झाल्यास वरोरा विधानसभा क्षेत्रात मोठे आंदोलन उभारू, असे रवि शिंदे यावेळी म्हणाले.