चंद्रपूर(आशिष घुमे) रूढी परंपरां जातीपातीचे बंधन तोडत विधवा युवतीशी मंगेशने लग्नगाठ बांधुन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. ही क्रांतिकारक घटना आज दि.१३ सोमवारी गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथे घडली.
गडचिरोली जिल्ह्यातील मूळची बोरी येथील मंगला नागोजी भोयर व चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील राजुली येथील मुकरू बावणे यांचा विवाह सहा महिन्यांपूर्वी झाला. आनंदाने सुखी संसारात रमून स्वप्न रंगवत असताना मंगला व बावणे कुटुंबियांवर मोठा आघात झाला. कुटुंबाला नियतीची नजर लागली. कुटुंबातील कर्ता पुरुष मुकरू बावणे याचे आजाराने निधन झाले. सहा महिन्यातच आपली मुलगी विधवा झाल्याने भोयर कुटुंब चिंताग्रस्त झाले. त्यातच मंगलाला वडिल नाही.मंगलाच्या मोठ्या बहीनेचे सासर असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील मोठ्या बहिनेकडे मंगला आली. वढोली येथील मंगेश हिरालाल ठाकूर या युवकाने धाडसी क्रांतिकारक निर्णय घेत विधवा युवतीशी दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने लग्नगाठ बांधली.दि.१३ सोमवारी वढोलीत मान्यवरांच्या उपस्थितीत हा अनोखा विवाह सोहळा पार पडला.
विधवा तरुणी व नवरा मुलगा वेगवेगळ्या जातीचे असताना सुद्धा आजच्या समाजाला नवी दिशा देण्याचा ठाकूर व भोयर कुटुंबीयांचा निर्णय कौतुकास्पद ठरला आहे.यावेळी तं.मु.स अध्यक्ष शामराव सोनटक्के,शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार,माजी सरपंच उमाकांत चुदरी,वन हक्क समिती अध्यक्ष संदिप लाटकर,अंगणवाडी सेविका अंजना झाडे,सेवा सहकारी संस्थेचे जयराम मानकर,संतोष खरबनकर,नामदेव चिंचोलकर,वंदना नामेवार,प्रिया आभारे यांनी नवं दाम्पत्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.रूढी परंपरां जातीपातीचे बंधन तोडत पार पडलेला अनोखा विवाह सोहळा गोंडपिपरी तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्याला भूषणावह असल्याचे मत तालुक्यातील सुशिक्षित नागरिकांनी व्यक्त केले.