कोरची/गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बहुल असलेल्या कोरची येथील झंकारगोंदी जवळ कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध मागणी घेऊन बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू केले होते ज्यामध्ये रब्बी हंगामात एकूण १७ क्विंटल धान खरेदी केंद्र करावे, बेतकाठी व बेळगाव या दोन गावासाठी आठ हजार क्विंटल ची धान्य खरेदीची परवानगी द्यावी, खरीप हंगामातील धानाचे बोनस तात्काळ देण्यात यावे, शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे जोडणीसाठी ज्या शेतकऱ्यांनी डिमांड भरला त्यांची जोडणी तात्काळ करण्यात यावी अशा विविध मुदयासह आज आंदोलन करण्यात आले. सदर आन्दोलनाला उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे , तहसिलदार सी आर भंडारी तसेच कृषि विभागाचे अधिकारी लाकेश कटरे, विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता मिथिन मुरकुटे,सहायक अभियंता प्रफुल कुरसंगे यांनी भेट देऊन चर्चा केली. पण शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते तेव्हा पर्यंत उपविभागीय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून आंदोलन स्थळी येऊन चार दिवसांत संपूर्ण मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी यांचे मान ठेवून शेतकरी परिषदेचे बेमुदत चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात आले. चक्का जाम आंदोलन सकाळी १० पासून दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू होते ज्यामध्ये शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते. सदर कृषी विभागाने चुकीची माहिती दिल्यामुळे एकरी उत्पन्न कमी दाखविण्यात आले. त्यामुळे रब्बी हंगामात धान्य खरेदी प्रती एकर ९.५०क्विंटल ठरविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्याला लागुनच असलेल्या गोंदिया जिल्ह्यात प्रती एकर १७ क्विंटल खरेदी करण्याची मर्यादा आहे. या जिल्ह्यात सुध्दा धान्य खरेदी करण्याची मर्यादा ९.५० ऐवजी १७ क्विंटल करण्यात यावी. तालुक्यातील बेतकाठी आणि बेळगाव या दोन केंद्रावर रब्बी हंगामातील धान्य खरेदी केले जाणार असून या केंद्राची खरेदी मर्यादा ३०३६ क्विंटल आहे. ही मर्यादा वाढवून ८००० क्विंटल प्रती केंद्र करण्यात यावे. खरीप हंगामातील धान्य खरेदीचा बोनस अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले नाही. ते तात्काळ जमा करावे. महात्मा जोतिबा फुले कर्ज मुक्ती योजना व छत्रपती शिवाजी महाराज प्रोत्साहन योजना तातडीने राबविण्यात यावे. सन २०२०, २०२१ व २०२२ मध्ये दुष्काळ स्थितीत विद्युत महावितरणने शेतकऱ्यांना दिलेले वीजेचे बील माफ करण्यात यावे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील पाच वर्षापासून वीज जोडणीसाठी अर्ज केला आहे. अद्याप एकही वीज जोडणी केली नाही. शेतकऱ्यांना तात्काळ वीजेचे कनेक्शन द्यावे.कृषी केंद्रामधून होणारी शेतकऱ्यांची लुट थांबविण्यात यावी. प्रत्येक केंद्रावर बियाणे व खताचे दरपत्रक लावण्यास शक्तीचे करावे. असे यावेळी शेतकरी लोकांनी मागण्या केल्या.यावेळी ट्रक व मोटार वाहनांचे लांबच लांब रांगा लागून होत्या. त्यामुळे कुठलेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बेडगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक नितीश पोटे, पोलीस उपनिरीक्षक अनिल नानिकर यांनी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनाचे नेतृत्व नंदकिशोर वैरागडे, सुरेश काटेंगे, रामसुराम काटेंगे, अशोक गावतुरे, केशव लेनगुरे, आसाराम शेंडे, सियाराम हलामी, रंजित बागडेहरीया, भावराव मानकर, मेहरसिंग काटेंगे, सुनिल सयाम,रुपेश गंगबोईर,, रुपराम देवांगन, धनिराम हीळामी, सुखराम राऊत, महादेव बन्सोड,रामाधिन ताराम, तुलसीदास मडावी,शंकर जनबंधु यांनी केले.