मूल : मूल तालुक्यातील फिस्कुटी येथील शेतशिवारात दबा धरून बसलेल्या वाघाने विरई येथील ६६ वर्षीय रहिवासी दयाराम केशव मोहुर्ले यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना जखमी केले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दयाराम मोहुर्ले हे फिस्कुटी येथील शेतशिवारात असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले. त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्याने वाघाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच त्यांचे पुत्र अमित मोहुर्ले यांनी वडिलांना तातडीने मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, संजीवनी पर्यावरण संस्थेचे सदस्य तन्मय सिंह झिरे, स्वप्नील आककेवार तसेच सावली वनपरिक्षेत्रातील वनरक्षक लंकेश आखाडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमी दयाराम मोहुर्ले यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच विरई येथील समाजसेवक संजय मोहुर्ले यांनीही या प्रसंगी सहकार्य केले.
परिसरात वाघाच्या हालचाली वाढत असल्याने शेतशिवारात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वनविभागाने या परिसरात वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करावे, अशी मागणी होत आहे.













