गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात माओवाद्यांनी पुरून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील शस्त्रसाठा व स्फोटक साहित्य गडचिरोली पोलिसांनी जप्त केले. पोलिसांच्या विशेष अभियानादरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, जप्त साहित्यापैकी माओवादी साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून जंगल परिसरात सातत्याने अभियान राबविले जात आहे. सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी तसेच घातपाताच्या कारवायांसाठी माओवादी विविध प्रकारची शस्त्रे व स्फोटक साहित्य जंगलात लपवून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या गोपनीय माहितीच्या आधारे ६ ऑक्टोबर रोजी कोपर्शी जंगल परिसरात विशेष अभियान राबविण्यात आले. या अभियानासाठी पथकातील ५ तुकड्या तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या २ पथकांची मदत घेण्यात आली.शोधमोहीमेदरम्यान जंगल परिसरात लपवून ठेवलेला शस्त्रसाठा पोलिसांच्या हाती लागला.
कारवाईत एक .303 रायफल, दोन सिंगल शॉट रायफल, दोन गावठी पिस्तूल, एक बीजीएल लाँचर, दहा बीजीएल सेल, २१ जिवंत काडतुसे, सात डेटोनेटर, १५० मीटर केबल वायर, दोन मॅगझीन, दोन कुकर, तीन वॉकीटॉकी, तीन वॉकीटॉकी चार्जर आणि दोन वॉकीटॉकी बॅटऱ्या असा साहित्यसाठा जप्त करण्यात आला.
जप्त केलेले माओवादी साहित्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे माओवादी कारवायांसाठी जंगलात लपवून ठेवण्यात आलेला शस्त्रसाठा उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
गडचिरोली पोलिसांकडून माओवादीविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले असून, जंगल परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










