मुंबई : राज्यातील खासगी शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्क नियंत्रणासाठी विभागीय स्तरावर शुल्क नियामक समित्या स्थापन केल्या असून शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खाजगी शाळांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची आपुर्ती शासनाने केली असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानपरिषदेत दिली.
कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शुल्ककपातीसाठी १२ ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार १५ टक्के शुल्क कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार अनेक शाळांनी शुल्क कपात केली आहे, तर काही शाळा न्यायालयात गेल्या. शुल्कवाढ रोखली जावी यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर व औरंगाबाद या पाच विभागात विभागीय शुल्क समितींची स्थापना करण्यात आली असून कोल्हापूर, अमरावती व लातूर तीन विभागीय शुल्क नियामक समित्यांचा अतिरिक्त कार्यभार पुणे, नागपूर व औरंगाबाद यांना सोपविण्यात आला आहे.
विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना किमान वेतन मिळावे, त्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळावा आणि तेथील शिक्षकांची पिळवणूक होऊ नये यासाठी शासन सकारात्मक असून त्यादृष्टीने कार्यवाही करण्यात येईल. या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनासंदर्भातही शासन विचार करेल, असेही राज्यमंत्री श्री. कडू यांनी सांगितले.
आमदार सर्वश्री रविंद्र फाटक, प्रवीण दरेकर, डॉ.रणजीत पाटील आदींनी याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला राज्यमंत्री श्री.कडू यांनी उत्तर दिले.
अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा संरक्षणाबाबत १५ दिवसांत कार्यवाही – राज्यमंत्री बच्चू कडू यांची विधान परिषदेत माहिती
राज्यातील अंशतः अनुदानित शाळा व तुकड्यांवरील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अन्य शाळेत समायोजित करून त्यांना सेवा संरक्षण देण्याबाबत पंधरा दिवसांत कार्यवाही करण्यात, येईल, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
आमदार सर्वश्री किरण सरनाईक, श्री. नागोराव गाणार, डॉ. रणजीत पाटील यांनी याबाबत प्रश्न विचारले.
सम्यक विचार समितीचा अहवाल लवकरच सादर करू : राज्यमंत्री बच्चू कडू
राज्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित पदावर व तुकड्यांवर १ नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात गठीत केलेल्या सम्यक विचार समितीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर लवकरच विधिमंडळात सादर करू, अशी माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
१ नोव्हेंबर २००५ पुर्वी सेवेत आलेल्या विनाअनुदान व अंशतः अनुदानित परंतु १ नोव्हेंबर २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शाळेतील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सभापतींच्या सूचनेनुसार सम्यक विचार समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर पटलावर ठेवण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री श्री. कडू यांनी दिली.
विधानपरिषद सदस्य सर्वश्री आमदार नागोराव गाणार, अभिजित वंजारी, विक्रम काळे आदींनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्यमंत्री श्री.कडू यांनी उत्तर दिले.
परिविक्षाधीन सहायक शिक्षकांच्या मानधन वाढीबाबत सकारात्मक : राज्यमंत्री बच्चू कडू
राज्यातील परिविक्षाधीन सहायक शिक्षकांच्या मानधन वाढीबाबत वित्त विभागाच्या अभिप्रायानुसार सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानपरिषेदेत दिली.
राज्यातील सहायक शिक्षकांना सुरुवातीची तीन वर्षे मानधन मिळते. त्यांना वेतन देण्यात येत नाही, परंतु त्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत वित्त विभागाच्या अभिप्रायानंतर निर्णय घेण्यात येईल, असे राज्यमंत्री श्री.कडू यांनी सांगितले.
विधानपरिषद सदस्य सर्वश्री कपील पाटील, नागोराव गाणार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला श्री.कडू यांनी उत्तर दिले.