*मूल प्रतिनिधी*
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात भाजप-महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार पुन्हा रिंगणात असून त्यांच्याविरोधात काँग्रेस महाविकास आघाडीचे संतोषसिंग रावत आणि अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे मैदानात आहेत. मुनगंटीवार यांचा मजबूत आधार आणि कार्यक्षमता लक्षात घेता विरोधी उमेदवारांसाठी हा सामना आव्हानात्मक ठरत आहे.
मुनगंटीवार हे तीन वेळा मंत्री राहिल्याने त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि विकासाच्या दृष्टिकोनाचा प्रभाव मतदारांवर आहे. या उलट, संतोषसिंग रावत आणि डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी लढाई असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
काँग्रेसच्या मते गमावण्याची शक्यता
अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोऱ्या गेलेल्या अभिलाषा गावतुरे यांनी काँग्रेसच्या परंपरागत मतांवर परिणाम केला आहे. गेल्या वर्षभरात काँग्रेससोबत काम करून काही प्रमाणात मते खेचण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांचा बंडखोरीचा निर्णय काँग्रेससाठी तोट्याचा ठरत आहे.
विकासाच्या मुद्द्यावर भाजपचे वर्चस्व
भाजपचे परंपरागत मतदार आणि विकासाच्या व्हिजनने प्रेरित तरुण मतदार हे सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि राज्य पातळीवरील प्रभावाचा मतदारसंघाला येत्या पाच वर्षांत फायदा होईल, अशी जनतेची भावना आहे.
मुनगंटीवार यांच्याच कामगिरीवर विश्वास
सुधीर मुनगंटीवार यांनी 15 वर्षे बल्लारपूरसाठी काम केले असून सत्ता नसतानाही विकासकामे केली आहेत. आर्थिक नियोजन आणि प्रशासनावरची पकड हे त्यांच्या ताकदीचे मुख्य पैलू आहेत. त्यामुळे शेतकरी, बेरोजगार, सिंचन प्रकल्प आणि इतर पायाभूत सुविधांसाठी मतदारसंघातील जनता मुनगंटीवार यांनाच प्राधान्य देईल, असे चित्र स्पष्ट होत आहे.