गडचिरोली:जिल्ह्यातील अतिदुर्गम व आदिवसीबहुल अशी ओळख असलेल्या अहेरीचे प्रकल्प अधिकारी आदित्य जिवने (भाप्रसे) यांची २३ सप्टेंबर रोजी बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आदित्य चंद्रभान जिवने यांची डिसेंबर २०२३ मध्ये अतिदुर्गम भामरागडच्या प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती.सहाय्यक जिल्हाधिकारी, एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळतानाच अहेरीचे प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे (भाप्रसे) यांची बदली होताच त्यांना अहेरीचीही जबाबदारी सोपविण्यात आली होती.त्यानंतर अहेरी आणि भामरागड अश्या दोन्ही ठिकाणचा कारभार त्यांनी सांभाळला.नुकतेच एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी, भामरागडचे प्रकल्प अधिकारी म्हणून नमन गोयल (भाप्रसे) यांची नियुक्ती झाली.त्यांनतर आदित्य जिवने यांच्या कडे सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरीचे उपविभागीय अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी म्हणून स्वतंत्र कारभार होता.नुकतेच २३ सप्टेंबर रोजी सामान्य प्रशासन विभागाने त्यांचे बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्तीचे आदेश निर्गमित केले आहे.
आदित्य जिवने (भाप्रसे) हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील असून कोरोना काळात मृत्यूची झुंज देत त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यांनी प्रशिक्षण कालावधीत बीड जिल्ह्यात पटोद्याचे उपविभागीय अधिकारी, बीड तहसीलदार,बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, माजलगाव नगरपालिकेचे सीओ पदाची सूत्रे सांभाळली आहेत. माजलगाव मध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवून अतिक्रमण धारकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. बीड तहसीलदार व पटोदा उपविभागीय अधिकारी असताना वाळू माफियांवर कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडले होते. बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. त्यामुळे बीड जिल्ह्यात डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.परत एकदा त्यांची बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे हे विशेष.
अहेरीचे प्रकल्प अधिकारी म्हणून कुशल जैन यांची नियुक्ती
आदित्य जिवने यांची बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या ठिकाणी कुशल जैन (भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कुशल जैन हे मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर येथील रहिवासी आहेत. ते मायक्रोसॉफ्ट इंजिनियर होते. त्यांनी २०२१ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली आहे.त्यांनी यूपीएससी परीक्षेत संपूर्ण भारतातून ४० वा रँक प्राप्त केला.