गडचिरोली: वाघाच्या हल्ल्यात बैल जागीच ठार झाल्याची घटना मुलचेरा तालुक्यातील अंबेला ते घोट मार्गावरील जंगल परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अंबेला गावातील गाई-बैल घोट रस्त्यावरील जंगल परिसरात चरायला जातात.हा जंगल परिसर वनविभाग आणि वन विकास महामंडळाकडे येतो.शंकर कुळसंगे नामक गुराखी गाई-बैल चरायला नेले असता वन विकास महामंडळाच्या खंड क्रमांक ५१८ मध्ये एका बैलावर वाघाने हल्ला चढविला.त्यात बैल जागीच ठार झाला.अंबेला येथील सुरेश रामाजी गुट्टेवार यांचा बैल असल्याची माहिती त्यांनी दिली.या घटनेमुळे पुन्हा एकदा तालुक्यात वाघाची दहशत निर्माण झाली आहे.
या घटनेची माहिती वन विकास महामंडळाला मिळताच त्यांनी ८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घटनास्थळ गाठून पंचनामा केला.यापूर्वी देखील या मार्गावर वाघाच्या हल्ल्यात काही गाई-बैल ठार झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून गुराखी सुद्धा जंगलात जाणे बंद केले आहे.वाघाच्या हल्ल्यात बैल ठार झाल्याने सुरेश गुट्टेवार यांचा मोठं नुकसान झालं आहे.त्यामुळे वन विकास महामंडळ आणि वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
या घटनेबाबत वन विकास महामंडळ वेलगुरचे वनपरिक्षेत्राधिकारी सचिन वाघमोडे यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केला असता त्यांनी खंड क्रमांक ५१८ मध्ये वाघाने बैलावर हल्ला चढविल्याची माहिती ७ सप्टेंबर रोजी उशिरापर्यंत मिळाली. ८ सप्टेंबर रोजी सकाळी मोका पंचनामा करण्यात आला असून घटनास्थळी परिस्थिती बघता जवळपास तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला आहे.