गडचिरोली: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत येत असलेल्या मुलचेरा येथील शासकीय आश्रम शाळा व वसतिगृहाच्या नूतन इमारतीचे बांधकाम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे.याठिकाणी बांधकाम सुरू असतानाच चक्क सज्जा कोसळला.सज्जावरून खाली पडून एका तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
गीतेश ललित मिस्त्री (१९) असे तरुण मजुराचे नाव असून तो गुंडापल्ली येथील रहिवासी असून तो लहानपणापासून देशबंधुग्राम येथे आपल्या मावशीकडे राहत असल्याचे त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितले.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.घटनेची माहिती मिळताच मुलचेराचे पोलीस घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे हलविले आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आदिवासी विकास विभागांमार्फत जिल्ह्यात शासकीय आश्रम शाळा चालविले जातात. मुलचेरा तालुका मुख्यालयात नूतन व सुसज्ज शासकीय आश्रम शाळा व वस्तीगृह बांधकामासाठी आदिवासी विकास विभागाने जवळपास २५ कोटींची निधी उपलब्ध करून दिली. त्यात शासकीय आश्रम शाळेसाठी १३ तर वसतिगृह इमारत बांधकामासाठी १२ कोटी रुपयांची निधी प्राप्त झाली असून मागील वर्षी कामाचे टेंडरही पूर्ण झाले.भंडारा येथील एका कन्स्ट्रक्शन कंपनीला येथील वसतिगृह इमारत बांधकामाचे टेंडर मिळाले.मुलचेरा तालुक्यातील बरेच मजूर याठिकाणी पोटाची खडगी भरण्यासाठी कामाला आहेत.येथील काही मजुरांनी दिलेल्या माहितीनुसार गीतेश हा तिसरा माळ्याच्या सज्जावर बसून काम काम करत असताना चक्क सज्जाच खाली कोसळला.गीतेशच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे मजुरांचा सुरक्षिततेसाठी संबंधित कंत्राटदाराकडून कुठल्याही उपाययोजना करण्यात आले नसल्याचे मजुरांनी सांगितले.एवढेच नव्हे तर बांधकाम सुरू असतानाच सज्जा कोसळल्याने इमारतीच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.आश्रम शाळेच्या वस्तीगृहात शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी निवासी स्वरूपात राहतात.अशा निकृष्ट बांधकामामुळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.