गडचिरोली: स्वातंत्र्याच्या ७७ वर्षानंतर देखील गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात मुख्य रस्ते नदी नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात येथील नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात विविध आजाराचे रुग्ण आणि गरोदर मातांना याचा जबर फटका बसत आहे. जिल्ह्यातील कोरची तालुक्यात असंच एक विदारक चित्र समोर आलंय. कोरची तालुक्यातील चर्विदंड येथील एका गर्भवती महिलेला प्रसूती कळा आल्याने तिला खाटेचा कावड करून दोन किलोमीटर पायपीट करण्याची नामुष्की गावकऱ्यावर ओढवली. रोशनी शामराव कमरो (वय २३) असे त्या गर्भवती महिलेचे नाव आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १२ तालुक्यांचा समावेश आहे. कोरची हा अतिदुर्गम,आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त तालुका असून छत्तीसगड सीमेवर वसलेला तालुका आहे. या तालुक्यात बरेच गावांचा स्वातंत्र्याच्या ७७ वर्षानंतर देखील पाहिजे तसा विकास झाला नाही. तालुक्यातील चर्वीदंड येथील सौ. रोशनी शामराव कमरो या गर्भवती महिलेला पहाटेच्या सुमारास अचानक प्रसुतीकळा सुरू होतात.गावालगत दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या लेकुरबोडी येथे उपकेंद्र आहे. मात्र,लेकुरबोडी जाण्यासाठी ना पक्का रस्ता…ना नाल्यावर पूल त्यामुळे गावात रुग्णवाहिका आणि इतर कुठलाही चारचाकी वाहन जाऊच शकत नाही. त्यामुळे तिच्या घरच्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने खाटेची कावड करून लेकुरबोडी गाठले.
लेकुरबोडी येथून खाजगी वाहनाने कोरची तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल केले.येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून तिला गडचिरिलीसाठी रेफर केले. रुग्णवाहिकेने गडचिरोलीकडे जात असताना बेडगाव-पुराडा दरम्यान असलेल्या घाटमाथ्यावर भर रस्त्यात दोन ट्रक अडकून हा मार्ग अक्षरशः बंद होता. यावेळी रुग्णवाहिकेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कुरखेडा येथून दुसरी रुग्णवाहिका बोलावून तिला गडचिरोली पाठविले. या दरम्यान तिला काही अंतर पायी चालत जावे लागले.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात मुख्य रस्ते नदी नाल्यावर पूल नसल्याने सर्वसामान्यांसोबतच रुग्ण आणि गरोदर मातांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.नुकतेच २६ जुलै रोजी भामरागड तालुक्यातील भटपार येथील मालू केये मज्जी या ६७ वर्षीय जखमी पित्याला घेऊन मुलाला मित्राच्या मदतीने खाटेची कावड करून १८ किलोमीटर पायपीट करण्याची नामुष्की ओढवली होती. आता परत तीन ऑगस्ट रोजी हीच परिस्थिती कोरची तालुक्यात देखील बघायला मिळाली आहे.
कोरची तालुक्यातील अनेक गावात मुख्य रस्ते,नदी-नाल्यावर पूल नसल्याने अशीच परिस्थिती उद्भवली होती. सुदैवाने तिला जिल्हा मुख्यालयात हलविण्यात आले असले तरी वाटेत तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.त्यामुळे जिल्ह्याची ही परिस्थिती केव्हा बदलणार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.